भारतीय राजकारणात महत्वपूर्ण योगदाने देणारे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी संध्याकाळी प्रदीर्घ आजाराने दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. हळवा कवी, संयमी राजकारणी अशी वाजपेयींची ओळख होती. ९० च्या दशकात त्यांनी भाजपाला देशाच्या राजकारणात स्थिरावण्यात महत्वाची भूमिका निभावली होती. अटल बिहारी वाजपेयींनी काँग्रेस विरोधातील पक्षांना एकत्र आणून भाजपा प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा प्रयोग यशस्वी करुन दाखवला. ते पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

परराष्ट्र धोरण

अटल बिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात काही महत्वपूर्ण निर्णय झाले. वाजपेयींनी अमेरिकेबरोबर मैत्रीसंबंध विकसित करण्यावर भर दिला. त्यांच्या कार्यकाळात अमेरिकेबरोबर व्यापार वाढला. द्विपक्षीय संबंध सुधारले. शेजारच्या चीन बरोबरही आर्थिक संबंध विकसित करण्यावर भर दिला. दोन्ही देशांमधला सीमावाद सोडवण्यासाठी चर्चा सुरु केली.

पाकिस्तान बरोबर संबंध सुधारण्याचे प्रयत्न
पाकिस्तान बरोबरचा तणाव संपवण्यासाठी वाजपेयींनी विशेष प्रयत्न केले. दोन्ही देशांमधले संबंध सुधारण्यासाठी त्यांनी दिल्ली-लाहोर बससेवा सुरु करण्यासाठी पुढाकार घेतला. स्वत:हा त्या बसमध्ये बसून पाकिस्तानात गेले. वाजपेयी यांच्या परराष्ट्र धोरणातील तो एक महत्वपूर्ण उत्तम निर्णय होता. पण सवयीप्रमाणे पाकिस्तानने दगाबाजी केली.

यशस्वी अण्वस्त्र चाचणी
११ मे १९९८ हा दिवस आधुनिक भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्वाचा दिवस म्हणून गणला जातो. कारण याच दिवशी भारताने जगाला आम्हीही काही कमी नाही हे दाखवून दिले होते. राजस्थानच्या पोखरण रेंजमध्ये भारताने याच दिवशी यशस्वी अणू चाचण्या केल्या होत्या. भारताच्या या गुप्त मोहिमेमुळे अमेरिकाही चकित झाली होती. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा तो क्षण होता. तत्कालिन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अणू चाचणीच्या या धाडसी निर्णयामुळे संपूर्ण जग अवाक् झाले होते.

कारगिल युद्ध
वाजपेयी पंतप्रधान असतानाच भारत आणि पाकिस्तानमध्ये कारगिल युद्ध झाले होते. पाकिस्तानी सैन्याने सीमा ओलांडून कारगिलमध्ये घुसखोरी केली होती. वाजेपयींना याविषयी समजताच त्यांनी भारतीय लष्कराला घुसखोरांना हुसकावून लावण्याचे आदेश दिले. भारतीय लष्कराने या युद्धात आपला सर्वोच्च पराक्रम दाखवत पाकिस्तानी घुसखोरांना पिटाळून लावत आपला भूभाग परत मिळवला. १९९९ सालच्या मे ते जुलै दरम्यान हे युद्ध लढले गेले.

शिक्षण आणि आर्थिक धोरण
अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारने सर्व शिक्षा अभियानाची सुरुवात केली. ६ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांना शिक्षणाचा मुलभूत अधिकार मिळवून दिला. त्यांच्या कार्यकाळातच राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्पाची सुरुवात झाली आणि देशात उत्तम दर्जाचे महामार्ग बांधले गेले.

वाजपेयी सरकारने आणलेल्या नव्या दूरसंचार धोरणामुळे दूरसंचार क्षेत्रात क्रांती घडली. वाजपेयी सत्तेवर असताना देशाची अर्थव्यवस्था उत्तम स्थितीमध्ये होती. जीडीपीचा दर हा आठ टक्क्यांच्या पुढे होता तर महागाई दर चार टक्क्यांपेक्षा कमी होता. भारताकडे परकीय चलन साठाही चांगल्या प्रमाणात होता.

संयुक्त राष्ट्रात हिंदीमध्ये भाषण
वाजपेयींनी १३ सप्टेंबर २००२ रोजी संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेला संबोधित केले. यावेळी वाजपेयींनी हिंदीमध्ये भाषण केले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Atal bihari vajpayees political career special moments