करुणानिधी हे ‘नास्तिक’ म्हणून ओळखले जात असले तरी अध्यात्मिक गुरु सत्य साईबाबा यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. ‘अध्यात्मिक गुरुंच्या बाबतीत मला भोंदूबाबा आणि खरे संत यांच्यातील फरक कळतो. सत्य साईबाबा हे जनतेच्या भल्यासाठी काम करतात’, अशी प्रतिक्रिया देत करुणानिधी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.
तामिळनाडूत करुणानिधी हे नास्तिक म्हणून ओळखले जातात. मात्र, सत्य साईबाबा यांच्याशी करुणानिधी यांचे चांगले संबंध होते. करुणानिधी यांनी जाहीरपणे सत्य साईबाबांच्या कार्याचे कौतुक करुन सर्वांनाच धक्का दिला होता. २००७ मध्ये सत्य साईबाबा यांनी चेन्नईतील गोपालपूरम येथील करुणानिधी यांच्या निवासस्थानाला भेट दिली होती. सत्य साईबाबा यांचा सत्कार करताना करुणानिधी यांनी केलेले विधान सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ठरले. ‘सत्य साईबाबा हे जनतेच्या भल्यासाठी काम करतात. ते गरीबी दूर करण्यासाठी काम करतात. अशी लोकं तर संतांपेक्षाही श्रेष्ठ असून ते देवा समानच आहेत’, असे करुणानिधींनी म्हटले होते. करुणानिधींचे हे विधान ऐकून डीएमकेतील नेते व कार्यकर्त्यांनीही आश्चर्य व्यक्त केले होते. सत्य साईबाबा यांच्या निधनानंतरही करुणानिधींनी २००७ मधील विधानांचा पुनरुच्चार केला होता. जनतेच्या भल्यासाठी नेते आणि अध्यात्मिक गुरु यांनी एकत्र येण्यात गैर काहीच नाही, असे करुणानिधींनी म्हटले होते.
नास्तिक करुणानिधी आणि सत्य साईबाबा यांची भेट कशी झाली, याची आठवणही डीएमकेच्या एका नेत्याने सांगितली होती. ‘२००७ मध्ये सत्य साईबाबा यांच्या सेक्रेटरीचा मला फोन आला होता. त्याने सत्य साईबाबांची करुणानिधी यांना भेटायची इच्छा आहे, असे सांगितले होते. मी सत्य साईबाबांची ही इच्छा करुणानिधींना कळवली. त्यांनी सुरुवातीला यावर आश्चर्य व्यक्त केले. मात्र शेवटी ठरल्यानुसार ही भेट झाली. तेव्हापासून दोघांमध्ये चांगले संबंध होते, असे त्या नेत्याने सांगितले.