गुन्हेगारी जगातून राजकारणात आलेला माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफची काही दिवसांपूर्वी प्रयागराजमध्ये हत्या करण्यात आली. अतिकवर अनेक गुन्हे दाखल होते. उमेश पाल हत्याकांडामधील तो प्रमुख आरोपी होती. तसेच अतिकच्या घरातील बहुतांश व्यक्ती गुन्हेगारी जगाशी संबंधित होत्या. अनेक हत्यांमधील आरोपी असलेला अतिकचा मुलगा असद अहमद अलिकडेच पोलीस चकमकीत मारला गेला. तर अतिकची दोन अल्पवयीन मुलं वेगवेगळ्या गुन्हेगारी कृत्यांमध्ये सापडल्यामुळे बालसुधारगृहांमध्ये आहेत. तसेच अतिकची पत्नी शाईस्ता परवीन देखील अतिकच्या अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शाईस्ता परवीन ही उमेश पाल हत्याकांडांमधील प्रमुख आरोपींपैकी एक आहे. तसेच अतिक तुरुंगात असताना शाईस्ता हीच अतिकचं गुन्हेगारी साम्राज्य सांभाळत होती. शाईस्ता गेल्या अनेक महिन्यांपासून फरार आहे. शाईस्ताच्या डोक्यावर ५० हजार रुपयांच्या बक्षीसाची घोषणा देखील करण्यात आली आहे.

शाईस्ताला शोधण्यासाठी पोलिसांनी जंग जंग पछाडलं आहे. अशातंच शाईस्ता लवकरच पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणार असल्याची चर्चा सुरू आहे. परंतु त्याआधी शाईस्ताची अतिकच्या आर्थिक साम्राज्यावर नजर आहे. उत्तर प्रदेश एसटीएफला मिळालेल्या माहितीनुसार शाइस्ता परवीन ही अतिक अहमदच्या नावावर असलेल्या कंपन्या आणि संपत्ती स्वतःच्या नावावर करण्याच्या प्रयत्नात आहे. शाईस्ता ही फरार आरोपी असली तरी पोलिसांना चकवत ती अतिकशी संबंधित एका चार्टर्ड अकाउन्टंटच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे.

शाईस्ता अतिकशी संबंधित ज्या चार्टर्ड अकाउन्टंटच्या संपर्कात आहे त्याला शोधण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. जेणेकरून ते शाईस्तापर्यंत पोहोचू शकतील. पोलिसांना चकमा देऊन शाईस्ता या सीएच्या संपर्कात असल्याचं सांगितलं जात आहे.

शाईस्ता आत्मसमर्पण करणार?

खरंतर शाईस्ता ही पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. परंतु त्याआधी ती पैशांचा बंदोबस्त करत आहे. जेणेकरून आत्मसमर्पण केल्यानंतर जामीन आणि न्यायालयीन लढाईदरम्यान ती त्या पैशांचा वापर करू शकेल. अशी माहिती आज तकने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

आत्मसमर्पण केल्यानंतर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात खटला लढत असताना मोठ्या वकिलांच्या फीसाठी शाईस्ता पैसे गोळा करण्यात गुंतलेली आहे. शाईस्ताने अतिकच्या टोळीतल्या खास लोकांकडे पैशांची मागणी केली असल्याचं बोललं जात आहे. तर दुसऱ्या बाजूला पोलिसांनी देखील पूर्ण तयारी केली आहे. पोलिसांनी अतिकच्या जवळच्या मित्रांची यादी तयार ठेवली आहे. पोलीस अतिकच्या या मित्रांच्या बँक खात्यांवर लक्ष ठेवून आहेत. शाईस्ताला आर्थिक मदत करणाऱ्यांवर पोलिसांचं बारीक लक्ष असून ते या लोकांवर देखील कारवाई करू शकतात.

हे ही वाचा >> कोण आहे अतिक अहमदची पत्नी शाईस्ता परवीन? पोलिसाची मुलगी असूनही ‘या’ कारनाम्यांमुळे झाली मोस्ट वाँटेड

काय म्हटलंय शाईस्ताच्या वकिलांनी?

एकीकडे शाईस्ता आत्मसमर्पण करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तर दुसऱ्या बाजूला अतिक अहमदचे वकील विजय मिश्रा यांनी जनसत्ता डॉट कॉमशी बोलताना सांगितलं की, शाईस्ताने आत्मसमर्पण करण्याबाबत काहीही ठरवलेलं नाही. तसं असतं तर तिने आत्मसमर्पण अर्ज दाखल केला असता. शाईस्ता संपर्कात नसली तरी तिला आत्मसमर्पण करायचं असतं तर तिने तसा अर्ज केला असता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Atiq ahmed begum shaista parveen can surrender lawyer vijay mishra denies asc
Show comments