गुन्हेगारी विश्वातून राजकारणात आलेल्या अतिक अहमदची शनिवारी रात्री उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज येथे हत्या करण्यात आली. पोलिसांच्या ताब्यात असतानाच अतिक आणि त्याचा भाऊ अशरफ या दोघांना गोळ्या घालून ठार करण्यात आलं. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलीस तपासात हळूहळू वेगवेगळी माहिती समोर येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अतिक आणि अशरफची हत्या करणाऱ्या तिन्ही आरोपींची मोडस ऑपरेंडी शोधण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. याचदरम्यान एक नवीन माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णालयाच्या बाहेरचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळालं आहे. यामध्ये तिन्ही हल्लेखोर हत्याकाडांच्या दिवशी दुपारी रुग्णालयाबाहेर रेकी करताना दिसले आहेत.

ज्या दिवशी अतिक आणि अशरफची हत्या करण्यात आली त्या दिवसातलं रुग्णालय आणि आसपासाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं जात आहे. पोलिसाचं एक पथक प्रत्येक सीसीटीव्ही कॅमेराचं फुटेज तपासत आहे. हत्येच्या दिवशी दुपारी तिन्ही आरोपी रुग्णालय परिसराची रेकी करून गेले. त्यानंतर रात्री माध्यमांचे प्रतिनिधी बनून ते तिथे आले. त्यानंतर त्यांनी अतिक आणि अशरफची हत्या करून आत्मसमर्पण केलं. यावरून दिसून येतंय की, हल्लेखोरांनी संपूर्ण माहितीनिशी हा हत्येचा कट रचला होता.

हे ही वाचा >> Atiq Ahmed Networth : अब्जाधीश अतिक अहमदकडे होती ११,६९० कोटींची संपत्ती, १८० तोळे सोनं आणि बरंच काही

पत्रकार बनून आलेले हल्लेखोर

उत्तर प्रदेशमधील कुख्यात गुंड अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची शनिवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दोघांनाही वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात असताना प्रयागराज वैद्यकीय महाविद्यालयाजवळ त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्यात दोघांचाही मृत्यू झाला. अतिक गेल्या काही दिवसांपासून पोलिसांच्या ताब्यात होता. हल्लेखोर हे माध्यमांचे प्रतिनिधी बनून इतर पत्रकारांमध्ये मिसळून अतिकसमोर गेले. अतिक पहिल्याच प्रश्नाचं उत्तर देत होता, इतक्यात तिन्ही हल्लेखोरांनी अतिक आणि अशरफच्या डोक्यात गोळ्या झाडल्या.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Atiq ahmed murder shooters done reiki before killing up police got cctv footage asc
Show comments