उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये काल एक खळबळजनक घटना घडली. गुन्हेगारी विश्वातून राजकारणात आलेला माजी खासदार अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशर्रफ अहमद या दोघांची पोलिसांच्या ताब्यात असताना शनिवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली. त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी प्रयागराज येथील वैद्यकीय महाविद्यालयात नेलं जात होतं, त्याचवेळी हा हल्ला झाला. हल्लेखोरांनी अतिकला संपवून आत्मसमर्पण केलं, पोलिसांनी तिगांना अटक केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे प्रयागराजमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
अतिक अहमद आणि अशर्रफ अहमद यांच्या हत्येनंतर पोलिसांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. अतिक आणि अशर्रफ यांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेले १७ पोलीस निलंबित करण्यात आले आहेत. तसेच प्रयागराजमधील शांतता आणि सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने शहरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. यासह कलम १४४ लागू (शांतता राखण्यासाठी किंवा कोणतीही आणीबाणी टाळण्यासाठी हे कलम लागू केलं जातं.) करण्यात आलं आहे. तसेच पोलिसांची सुट्टीदेखील रद्द करण्यात आली आहे. सुट्टीवर असलेल्या पोलिसांना कर्तव्यावर परतण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तसेच उत्तर प्रदेशमधील सर्व स्टेशन प्रभारी अधिकाऱ्यांना तातडीने त्यांच्या पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या परिसरात जाण्यास सांगण्यात आले आहे. यूपीमध्ये पोलिसांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. रजेवर गेलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना परत बोलावलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार मुख्य सचिव विशेष विमानाने प्रयागराजला जातील.
हे ही वाचा >> Who killed Atiq Ahmed : पत्रकार बनून आलेले हल्लेखोर? अतिकला गोळ्या घालून दिल्या घोषणा, पोलीस म्हणाले…
दुसऱ्या बाजूला, प्रयागराजमध्ये तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे लखनौ आयुक्तालय पोलीस सतर्क झाले आहेत. अतिरिक्त पोलीस उपायुक्त चिरंजीव नाथ सिन्हा हे सकाळी जुन्या लखनौच्या हुसैनाबादमध्ये पायी गस्त घालताना दिसले. तसेच त्यांनी सामान्य नागरिकांशी बातचित केली, गर्दी करू नका अशा सूचना त्यांनी लोकांना दिल्या. घाबरू नका असं सांगून लोकांना आश्वस्त केलं. यासह त्यांनी संपूर्ण परिसरातील एकंदरित परिस्थितीचा आढावा घेतला.