नवी दिल्ली : गुंड आणि समाजवादी पक्षाचा माजी खासदार आतिक अहमद याच्या हत्येची चौकशी करावी, अशी मागणी करणारी याचिका त्याच्या बहिणीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. आतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद या दोघांवर न्यायप्रक्रिया चालवण्याऐवजी त्यांची न्यायालयीन कोठडीत हत्या झाली असा आरोप त्यांची बहीण आयेशा नूरी यांनी केला आहे.
अहमद बंधू उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात असताना त्यांच्या झालेल्या हत्यांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग स्थापन करावा अशी मागणी आयेशा यांनी केली. उत्तर प्रदेश सरकारने आपल्या कुटुंबीयांना लक्ष्य करून चकमकीमध्ये हत्या, अटक आणि छळाची मोहीम राबवली आहे असा आरोपही आयेशा नूरी यांनी केला. या सर्वाची स्वतंत्र तपास संस्थेमार्फत र्संवकष चौकशी केली जावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
या प्रकरणातील पोलिसांना राज्य सरकारचा पूर्ण पाठिंबा असून सूड उगवण्यासाठी आमच्या कुटुंबीयांची हत्या, आरोप ठेवणे, अटक आणि छळ करण्यासाठी पोलिसांना संपूर्ण अभय देण्यात आले आहे असा आरोप आयेशा यांनी केला आहे. एप्रिल महिन्यात आतिक आणि अहमद अश्रफ यांना वैद्यकीय तपासणीसाठी प्रयागराज येथील वैद्यकीय महाविद्यालयात नेले जात असताना आतिक अहमद प्रसारमाध्यमांशी बोलत होता. त्या वेळी पत्रकार असल्याचा बहाणा करणाऱ्या तिघांनी आतिक आणि अश्रफ या दोघांना अगदी जवळून गोळय़ा घालून त्यांची हत्या केली होती.