अतिक आणि अशरफ अहमद या दोघांची शनिवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणातल्या तिन्ही शूटर्सना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात आता एक नवा खुलासा झाला आहे. अतिक आणि अशरफ या दोघांच्या शूटर्सने चौकशी दरम्यान हे सांगितलं आहे की लॉरेन्स बिश्नोईचा प्रभाव आमच्यावर होता. आतिक आणि अशरफ या दोघांना ठार करताना आमच्यावर लॉरेन्स बिश्नोईचा प्रभाव असल्याचं या दोघांनीही सांगितलं आहे. एनडीटीव्हीने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.
सनी सिंहने हे सांगितलं आहे की मी लॉरेन्स बिश्नोईची मुलाखत पाहिली होती. त्याने सिद्धू मुसेवालाची हत्या कशी केली हे सांगितलं होतं. लॉरेन्स हिंदुत्वाविषयी त्याची जी भूमिका सांगितली त्याचंही मी आकर्षण वाटलं होतं. अतिक अहमद आणि अशरफ या दोघांना ज्यांनी ठार केलं त्यातला मुख्य आरोपी हा सनी सिंह आहे. सनी सिंहसाठी १२ हून जास्त गुन्हे दाखल आहेत. इतर दोन आरोपींनाही सनी सिंह सोबत प्रतापगढ तुरुंगात ठेवण्यात आलं आहे. अतिक आणि अशरफ यांच्या हत्या प्रकरणात सनी सिंहची रविवारी चौकशी करण्यात आली. त्यावेळी सनी सिंहने ही माहिती दिली आहे.
अतिक अहमद आणि अशरफ अहमद या दुहेरी हत्याकांडात इतरही प्रश्न उपस्थित होत आहेत. गरीब कुटुंबातून येणारे आणि किरकोळ गुन्ह्यांमध्ये सहभागी असणाऱ्या या आरोपींकडे विदेशी बनावटीचं पिस्तुल कुठून आलं हा त्यातला मुख्य प्रश्न आहे. या प्रकरणी चौकशी सुरू आहे. या हत्याकांडानंतर विरोधी पक्षाने योगी सरकारवर टीका केली आहे. प्रयागराज मध्ये ही घटना घडली होती. शनिवारी रात्री १० च्या दरम्यान या दोघांना पोलीस मेडिकल तपासणीसाठी घेऊन जात असताना हल्लेखोरांनी या दोघांवर गोळ्या झाडल्या. ज्यामध्ये या दोघांचा मृत्यू झाला.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय चौकशी समितीची स्थापना केली आहे. पोलिसांनी या हत्या प्रकरणात आतापर्यंत तिघांना अटक केली आहे. लवलेश तिवारी (बांडा), अरुण मौर्य (कासगंज), सनी सिंह (हमीपूर) अशी या आरोपींची नावे आहेत. अतिक आणि अश्रफ यांच्या हत्येमुळे प्रसिद्धी मिळावी तसेच या कृत्याचा भविष्यात फायदा व्हावा, म्हणून आम्ही त्या दोघांची हत्या केली, असे हल्लेखोरांनी सांगितले आहे.