Atishi : आतिशी मार्लेना यांनी आज दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. आम आदमी पक्षाचे प्रमुख नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी १७ सप्टेंबरला त्यांच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आतिशी यांची एकमताने निवड मुख्यमंत्री म्हणून करण्यात आली. २१ सप्टेंबर शनिवार या दिवशी आतिशी यांना उपराज्यपालांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ दिली. आतिशी या आपच्या आमदार आहेत. अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदिया यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात.
दिल्लीच्या सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून आतिशी यांच्या नावाची नोंद
दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून आतिशी यांनी शपथ घेतली. त्यांच्यासह पाच आमदारांनाही मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. उपराज्यपालांच्या निवासस्थानी हा सोहळा पार पडला. आतिशी या दिल्लीच्या सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरल्या आहेत. त्यांच्या शपथविधी सोहळ्याला अरविंद केजरीवाल यांच्यासह इतर प्रमुख नेते उपस्थित होते. १५ सप्टेंबर रोजी अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार हे जाहीर केलं होतं. त्यानंतर आम आदमी पक्षाच्या मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार याची चर्चा रंगली होती. पुढच्या दोन दिवसातच आतिशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. आता आतिशी यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
आतिशी कोण आहेत?
आतिशी मार्लेना या दिल्लीच्या कालकाजी मतदारसंघातून आमदार आहेत.
अरविंद केजरीवाल सरकारमध्ये त्यांच्याकडे सर्वाधिक खात्यांची जबाबदारी होती.
माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या सल्लागार म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे.
आतिशी दिल्ली सरकारमधील उच्चशिक्षित मंत्र्यांपैकी एक होत्या, आता त्या मुख्यमंत्री झाल्या आहेत.
आतिशी यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून इतिहासाची मास्टर्स पदवी घेतली आहे.
२०१९ पासून आतिशी सक्रिय राजकारणात
आतिशी ( Atishi ) यांचा जन्म दिल्लीतील एका उच्चशिक्षित कुटुंबात झाला. त्यांचं कॉलेजपर्यंतचे शिक्षण दिल्लीतूनच झालं आहे पुढे त्या उच्च शिक्षणासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठात गेल्या. २०१२ मध्ये आम आदमी पक्षाची स्थापन झाली, आतिशी या २०१९ मध्ये सक्रिय राजकारणात आल्या. त्यावेळी पक्षाने आतिशी यांना पूर्व दिल्लीतून भाजपचे उमेदवार गौतम गंभीर यांच्या विरोधात उमेदवारी दिली होती. यात आतिशी यांचा या निवडणुकीत चार लाखांहून अधिक मतांनी पराभव झाला, त्या तिसऱ्या क्रमांकावर होत्या. मात्र, पुढच्या वर्षी कालकाजी विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आणि त्या विजयी झाल्या. तीन वर्षांनंतर मनीष सिसोदिया यांच्या राजीनाम्यानंतर त्या दिल्ली सरकारमध्ये मंत्री झाल्या. २०१९ ते २०२४ अवघ्या पाच वर्षांत त्यांनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मजल मारली आहे ही बाब महत्त्वाची आहे.
आतिशी यांच्या आधी झाल्या आहेत दोन महिला मुख्यमंत्री
आतिशी या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री आहेत. त्याआधी भाजपाच्या सुषमा स्वराज आणि काँग्रेसच्या शीला दीक्षित यांनी दिल्लीचं मुख्यमंत्रिपद सांभाळलं आहे. १९९८ मध्ये सुषमा स्वराज या ५२ दिवसांसाठी मुख्यमंत्री झाल्या होत्या. तर १९९८ मध्ये शीला दीक्षित या १५ वर्षे २५ दिवसांसाठी मुख्यमंत्री होत्या. दीर्घ काळ मुख्यमंत्री राहण्याचा रेकॉर्ड हा शीला दीक्षित यांच्या नावे आहेत. यानंतर आता आपच्या नेत्या आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्या आहेत.