दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्लीतील जिल्हा न्यायालयाने २८ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. सहा दिवसांची कोठडी सुनावल्यानंतर आम आदमी पक्ष आक्रमक झाला असून सर्वोच्च न्यायालय आणि रस्त्यावरील लढाई लढण्यासाठी सज्ज झाला आहे. पक्षाच्या नेत्या आणि दिल्लीच्या मंत्री आतिशी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर टीका केली. दिल्लीतील कथित मद्य घोटाळयाशी निगडित असलेल्या कंपनीने भाजपाला निवडणूक रोखे दिले आणि ते भाजपाने स्वीकारले, असा गंभीर आरोप आतिशी यांनी केला.
ईडीच्या धाकामुळं केजरीवालांच्या विरोधात जबाब
दिल्ली येथे शनिवारी पत्रकार परिषदेत बोलत असताना आतिशी म्हणाल्या, दिल्ली सरकारच्या नवीन अबकारी धोरणानुसार (आता रद्द केलेले) अरबिंदो फार्माचे मालक शरत चंद्र रेड्डी यांनाही मद्यविक्री करण्यासाठी परवानगी मिळाली होती. एपीएल हेल्थकेअर आणि EUGIA फार्मा या कंपन्याची मालकीही शरत चंद्र रेड्डी यांच्याकडे आहे. मी अरविंद केजरीवाल किंवा त्यांचे सहकारी विजय नायर आणि ‘आप’च्या कोणत्याही नेत्याला पैसे दिलेले नाहीत, असा जबाब शरत चंद्र रेड्डी यांनी ९ नोव्हेंबर रोजी नोंदविला आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना अटक करण्यात आले. त्यानंतर काही महिन्यांनी शरत चंद्र रेड्डी यांनी आपला जबाब बदलला आणि काही दिवसांनी त्यांची जामिनावर सुटका झाली.
ईडी मागच्या दोन वर्षांपासून कथित मद्य घोटाळ्यातील पैसे कुठे गेले? याचा माग काढत आहे. पण नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या निवडणूक रोख्याच्या माहितीमधून हे पैसे कुठे मुरले? याची माहिती मिळते, असे माहिती आतिशी यांनी दिली. त्या पुढे म्हणाल्या, “कथित घोटाळ्यातील पैसे कुठे गेले, हे निवडणूक रोख्यांमधून दिसून येत आहे. दिल्लीत नवे अबकारी धोरण राबविले जात असताना शरत रेड्डी यांनी भाजपाला साडे चार कोटी निवडणूक रोख्यातून दिले. त्यानंतर जेव्हा त्यांना अटक झाली, तेव्हा त्यांनी आणखी ५५ कोटींचा निधी दिला.”
“पहिल्यांदा रेड्डी यांना अटक होते, मग ते भाजपाला पैसे देतात, त्यानंतर ते केजरीवाल यांच्याविरोधात जबाब नोंदवितात, त्यानंतर ईडी त्यांची सुटका करते आणि मग शेवटी ते पुन्हा भाजपाला पैसे देतात…”, असे हे चक्र असल्याची टीका आतिशी यांनी केली.
विश्लेषण : दिल्ली मद्यधोरण केजरीवाल आणि कंपनीला आणखी किती शेकणार?
जेपी नड्डांना अटक करा
कथित मद्य घोटाळ्यातील पैसे हे आम आदमी पक्षाकडे नाही तर भाजपाकडे गेले आहेत. त्यामुळे मी पंतप्रधान मोदी यांना आव्हान देते की, त्यांनी भाजपा पक्षाला मुख्य आरोपी करावे आणि ईडीने भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना अटक करावी, असेही ‘आप’नेत्या आतिशी म्हणाल्या.