Atishi alleges Arvind Kejriwal murder conspiracy: दिल्लीत ५ फेब्रुवारी रोजी विधानसभा निवडणूक २०२४ साठी मतदान होणार आहे. यापूर्वी दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलेच तापताना दिसत आहे. यादरम्यान केजरीवाल यांच्या प्रचार मोहिमेदरम्यान झालेल्या कथित हल्ल्याच्या मुद्द्यावर बोलताना, दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी शुक्रवारी दिल्ली पोलिसांवर केजरीवाल यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप केला आहे.
“केजरीवाल यांच्या हत्येच्या कटात दोघांचा समावेश आहे, एक भाजपा आणि दुसरे दिल्ली पोलीस. दोघेही केजरीवाल यांना संपवण्याचा कट करत आहेत. एकामागे एक हल्ल्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत”, पीटीआयच्या हवाल्याने हिंदुस्तान टाइम्सने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
दिल्लीच्या आपच्या मुख्यमंत्री आतिशी या कालकाजी मतदारसंघातून आपच्या उमेदवार आहेत. त्यांनी निवडणूक आयोगाकडे पंजाब पोलिसांची सुक्षाव्यवस्था पुन्हा देण्यात यावी अशी मागणी केली आहे.
आतिशी काय म्हणाल्या?
“आम्ही सातत्याने पाहात आहोत की अरविंद केजरीवाल यांच्यावर अनेक हल्ले करण्यात आले. ऑक्टोबर २४ रोजी केजरीवाल यांच्यावर विकासपूरी येथे दिल्ली पोलिसांसमोर हल्ला झाला. आम्ही सोशल मीडियावर शोध घेतला, तेव्हा हल्ला करणारा हा भाजपाचा कार्यकर्ता असल्याचे समोर आले… त्यांच्यावर पुन्हा नोव्हेंबर ३० रोजी मालविय नगर येथे सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान हल्ला झाला. यावेळी मारहाण करण्याचा प्रयत्न केला गेला”.
“पुढील हल्ल्या जानेवारी १८ रोजी नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. आम्ही सोशल मीडियावर तपास केला असता सर्व हल्लेखोर हे भाजपाशी संबंधीत असल्याचे आढळून आले… काल त्यांच्यावर हरी नगर येथे हल्ला झाला, पण दिल्ली पोलिसांनी त्यांना रोखले नाही. काली बारी येथे ते प्रचारासाठी जाणार होते, तर भाजपा कार्यकर्त्यांना तेथे काठ्या आणि दगड घेऊन त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी आणण्यात आले. संजय सिंग यांना जाऊन तो हल्ला थांबवावा लागला पण दिल्ली पोलीस मदतीला आले नाहीत”, असेही आतिशी म्हणाल्या.
आतिशी यांनी आरोप केला की, भाजपाबरोबर हातमिळवणी केल्याने दिल्ली पोलिसांनी हल्ले थांबवण्यासाठी किंवा नंतरही आरोपींविरोधात कारवाई म्हणून काहीही केले नाही. “आमचा दिल्ली पोलिसांवर विश्वास नाही कारण अमित शाह यांच्या नियंत्रणाखाली आहेत”, असेही आतिशी म्हणाल्या.
दिल्ली पोलिसांवर विश्वास नाही
दिल्लीत विधानसभा निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे, तर ८ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. यादरम्यान दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी गंभीर आरोप केले आहेत.