New Chief Minister of Delhi Atishi Marlena : गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावरून बरीच चर्चा पाहायला मिळाली. दिल्लीच्या राजकीय वर्तुळात अनेक नावांची चर्चा झाली. मात्र, अरविंद केजरीवाल नेमकं कुणाचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी प्रस्तावित करतात? याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. या चर्चेत आधी सर्वात वर नाव होतं ते उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचं. मात्र, त्यांनी आधीच हे पद स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्यांच्या खालोखाल नाव होतं दिल्लीच्या शिक्षणमंत्री आतिशी मार्लेना यांचं. अखेर त्यांच्या नावावरच शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळे आता शीला दीक्षित यांच्यानंतर जवळपास एका तपानंतर दिल्लीला पुन्हा एकदा महिला मुख्यमंत्री लाभणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आम आदमी पार्टी विधीमंडळ पक्षाची बैठक आज पार पडली. या बैठकीत आतिशी यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. या बैठकीत अरविंद केजरीवाल यांनी आतिशी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. आपच आमदारांनी देखील आतिशी यांच्या नावाच्या प्रस्तावाचं स्वागत केलं. आतिशी येत्या दोन ते तीन दिवसांत दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.

हे ही वाचा >> Atishi : दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून निवड झालेल्या आतिशी कोण आहेत?

आतिशी या आम आदमी पार्टीमधील वरच्या फळीतील नेत्यांपैकी एक आहेत. तसेच त्या अरविंद केजरीवाल यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. माजी उपमुख्यमंत्री व शिक्षणमंत्री मनिष सिसोदिया तुरुंगात गेल्यानंतर केजरीवाल यांनी शिक्षण मंत्रालयासह सिसोदिया यांच्याकडील खाती व इतर महत्त्वाची खाती आतिशी यांच्याकडे सोपवली होती. आतिशी या कालकाजी विधानसभा मतदार संघाच्या आमदार आहेत.

हे ही वाचा >> Kolkata Rape Case : कोलकात्यातील डॉक्टरांच्या आंदोलनाला यश, ममता बॅनर्जींकडून तीन प्रमुख मागण्या मान्य, तरीही आंदोलन चालूच राहणार

कोण आहेत आतिशी मार्लेना?

आतिशी या आम आदमी पार्टीमधील वरिष्ठ नेत्या व सामाजिक कार्यकर्त्या म्हणून दिल्लीत सर्वांच्या ओळखीच्या आहेत. त्यांनी सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांच्या सार्वजनिक जीवनाला सुरुवात केली होती. २०१३ मध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या भ्रष्टाचाराविरोधातील आंदोलनात त्या सहभागी झाल्या होत्या. सध्याच्या आम आदमी पार्टीतील बहुसंख्य नेते हे त्या आंदोलनात सहभाघी झाले होते. त्याचदरम्यान, आतिशी या केजरीवाल व इतर नेत्यांच्या संपर्कात आल्या. पुढे त्यांनी आम आदमी पार्टीद्वारे राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्या दिल्लीतल्या कालकाजी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांनी दिल्लीच्या शिक्षण मंत्रालयासह, सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटन मंत्री म्हणून देखील काम केलं आहे. त्या आम आदमी पार्टीच्या संस्थापक सदस्य देखील आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Atishi become new chief minister of delhi as arvind kejriwal resigns asc