भारत आणि पाकिस्तान यांच्यातील प्रलंबित मुद्द्यांवर चर्चा होण्यासाठी दहशतवाद आणि हिंसामुक्त वातावरणाची गरज असल्याचा संदेश नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना पत्राद्वारे दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना ‘पाकिस्तान दिवसा’निमित्त पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या. त्यावेळी त्यांनी पत्रात आपले म्हणणे मांडले. याबद्दल ट्विटरवरून बोलताना मोदी यांनी द्विपक्षीय चर्चेच्या माध्यमातून भारत-पाकमधील प्रश्न सुटू शकतात, असा विश्वास व्यक्त केला. मात्र, या चर्चेसाठी दहशतवाद आणि हिंसामुक्त वातावरण गरजेचे असल्याचेही त्यांनी म्हटले. गेल्या आठवड्यात जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या एकापाठोपाठ हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर मोदी यांचे हे वक्तव्य सूचक आहे. भारतीय हद्दीत घुसखोरी केलेल्या या दहशतवाद्यांनी शुक्रवारी कटुआ येथील पोलीस ठाण्याला तर शनिवारी सांबा सेक्टरमधील लष्करी छावणीला लक्ष्य केले होते.

Story img Loader