काही दिवसांपूर्वी राजस्थान दहशतवादी विरोधी पथक (एटीएस) आणि अणुउर्जा विभागाने (डीएई) केलेल्या कारवाईदरम्यान देशातील आण्विक साहित्याच्या तस्करीचा पर्दाफाश झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. अणुउर्जा निर्मितीसाठी वापरण्यात येणारे बेरियल हे खनिज असणारी माती भारतातून चीनमध्ये निर्यात केली जात असल्याचे यावेळी उघड झाले. साधारण जानेवारी महिन्याच्या सुरूवातीस ‘डीएई’ला बेरियलची अवैध निर्यात होत असल्याची माहिती निनावी पत्राद्वारे मिळाली होती.  ही माहिती मिळाल्यानंतर ‘डीएई’कडून तातडीने भारतीय गुप्तचर यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या होत्या. गुप्तचर यंत्रणांकडून ही माहिती राजस्थान एटीएसला पुरविण्यात आली. त्या आधारे कारवाई करत राजस्थान एटीएसने जानेवारीच्या अखेरीस सहाजणांना अटक करत त्यांच्याकडून बेरियल असणारी तब्बल ३१ टन खनिजयुक्त माती जप्त केल्याचे वृत्त आहे. खनिजयुक्त मातीतून बेरियम वेगळे करून अणुउर्जा प्रकल्प , अंतराळ तंत्रज्ञान आणि स्कॅनिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणांमध्ये त्याचा वापर केला जातो. बेरियमचा अशाप्रकारे वापर करणाऱ्यांमध्ये अमेरिका, रशिया, ब्राझील यांच्यासह चीनचाही समावेश आहे. दरम्यान, या घटनेनंतर अटक करण्यात आलेल्या सहाजणांविरोधात अणुउर्जा कायद्यानुसार जयपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात गुजरातच्या कंदाला बंदरावरून २० टन खनिजयुक्त माती हाँगकाँगला निर्यात केल्याची चौकशीदरम्यान उघड झाली आहे. राजस्थानमध्ये देशातील १० टक्के बेरियमचा साठा असून ‘डीएई’कडून उत्खननावर बंदी घालण्यात आलेल्या खनिजांमध्ये बेरियमचा समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Atomic material smuggling racket busted rajasthan ats arrests six