अहमदाबाद : खोटे आरोप करून कायदेशीर कारवाईत अडथळा आणल्याच्या एका ताज्या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्यां तिस्ता सेटलवाड यांचा ताबा गुजरातच्या विशेष तपास पथकाने (एटीएस) आता अहमदाबाद गुन्हे शाखेकडे दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईत शनिवारी ‘एटीएस’ने ताब्यात घेतल्यानंतर रविवारी पहाटे गुन्हे शाखेचे निरीक्षक डी. बी. बरड यांच्या तक्रारीवरून अहमदाबाद गुन्हे शाखेत सेटलवाड यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता.

शनिवारी दुपारी त्यांना मुंबईतील त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आले होते. गुन्हे शाखेच्या सूत्राने सांगितले, की, अहमदाबादला आणल्यानंतर सेटलवाड यांना रविवारी पहाटे शहर गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले. त्यांना लवकरच अटक केली जाईल. शनिवारी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर स्थानिक पोलिसांना सेटलवाड यांच्यावरील कारवाईची माहिती देण्यासाठी त्याला मुंबईतील सांताक्रूझ पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तेथून गुजरात पोलिसांच्या पथकाने त्यांना अहमदाबादला आणले. २००२ च्या दंगल प्रकरणात गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि इतरांना विशेष तपास पथकाने दिलेल्या निर्दोषत्व अहवालाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याच्या एका दिवसानंतर सेटलवाड यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.

‘सिटिझन्स फॉर जस्टिस अँड पीस’ या स्वयंसेवी संस्थेच्या सचिव असलेल्या सेटलवाड यांच्यावर खोटी तथ्ये आणि कागदपत्रे तयार केल्याचा आरोप आहे.

२००२ च्या गुजरात दंगल प्रकरणांच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने स्थापलेल्या विशेष तपास पथकासमोर केलेल्या विविध सादरीकरणांतून साक्षीदारांवर प्रभाव पाडणे व न्या. नानावटी-शहा चौकशी आयोगासमोर आरोपींनी केलेल्या युक्तिवादात खोटे पुरावे तयार करून कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर केल्याचाही आरोप सेटलवाड यांच्यावर आहे. सर्वोच्च न्यायालयात मोदींसह इतरांविरुद्ध दाखल याचिकेत झाकिया जाफरीसह सेटलवाड आणि त्यांची स्वयंसेवी संस्थेतील सहकारी याचिकाकर्ते होते.  सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी ही याचिका फेटाळून लावली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ats hands over teesta setalvad to ahmedabad crime branch zws