शहराच्या वेशीबाहेरच्या पोलीस पब्लिक स्कूल शाळेच्या पटांगणात बुधवारी सकाळी थोडी मुले क्रिकेट खेळण्यात दंग होती. कुख्यात अफज़्‍ाल गुरूचा मृतदेह त्याच्या आप्तांकडे द्यावा, या मागणीसाठी दहशतवाद्यांनी पुकारलेल्या बंदमुळे शाळा बंद होती, त्यामुळे नेहमीसारखी मुलांची खच्चून गर्दी नव्हती. क्रिकेटपटूच्या वेशात ‘त्या’ दोघांनी शाळेच्या पटांगणावर प्रवेश केला तेव्हा त्यांना कुणीच हटकले नाही. त्यांच्या खांद्यावर क्रीडासाहित्याच्या किट होत्याच. मेदानात येताच त्यांनी त्या किटमधून एके-४७ बंदुका काढल्या आणि अंदाधुंद गोळीबार सुरू केला तेव्हा  ‘फिदाई’ अर्थात आत्मघातकी अतिरेक्यांचा हा हल्ला आहे, या जाणिवेने या मैदानालगतचा केंद्रीय राखीव पोलीस दलाचा तळ पुरता ढवळून निघाला.
या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले तर तीन नागरिकासह १५ जवान जखमीही झाले. अध्र्या तासाच्या धुमश्चक्रीनंतर या दोघा अतिरेक्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आले.
या दोघांचा खात्मा झाला तेव्हा त्यांच्याकडे दोन एके-४७ रायफली, दोन भरलेली पिस्तुले, सात हातबॉम्ब, काडतुसे, कराचीच्या कंपनीची औषधे तसेच काही भारतीय नोटा सापडल्या.
सकाळी पावणेदहा वाजता हल्ला सुरू झाला तेव्हा जम्मूत राज्य विधानसभेचे अधिवेशन सुरू होते. हल्ल्याचे वृत्त समजताच मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला तातडीने श्रीनगरला आले आणि त्यांनी अतिवरिष्ठ पातळीवरील पोलीस व संरक्षण दलाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. तोच एका वृत्तसंस्थेच्या कार्यालयातला दूरध्वनी खणखणला. आपण हिजबुल मुजाहिदीनचा प्रवक्ता असून हा हल्ला आम्हीच केला आहे, असे त्याने सांगितले. काही मिनिटांतच पुन्हा त्याचाच दूरध्वनी आला आणि आपला आधीचा दावा त्याने मागे घेतला. हा हल्ला लष्कर ए तयबाने केल्याचा तर्क होता. केंद्रीय गृहसचिव आर. के. सिंग यांनी दिल्लीत सांगितले की, हल्लेखोर स्थानिक नव्हते. ते सीमेपलीकडून आले होते. हे अतिरेकी पाकिस्तानचे होते, असा दावा सरकारने केला असला तरी पाकिस्तानने त्याचा इन्कार केला आहे.
शहीद जवानांची नावे
सहपोलीस उपनिरीक्षक ए. बी. सिंग, कॉन्स्टेबल ओमप्रकाश, एल. पारमोल, सुभाष आणि सतीश शहा.
तीन वर्षांनंतरचा हल्ला
जम्मू आणि काश्मीरमध्ये तीन वर्षांनंतरचा हा सर्वात मोठा हल्ला आहे. याआधी ६ जानेवारी २०१० रोजी श्रीनगरच्याच लाल चौकात पोलीस पथकावर झाला होता. तो हल्लाही दोन अतिरेक्यांनीच केला होता. पोलीस व सुरक्षा जवानांनी प्रत्युत्तर द्यायला सुरुवात करताच हे अतिरेकी ‘हॉटेल पंजाब’मध्ये लपले. दोन दिवसांच्या चकमकीनंतर त्यांचा खात्मा झाला पण एक पोलीस शहीद झाला व एक नागरिकही मृत्युमुखी पडला होता.
मुंबईतल्या हल्ल्याची आठवण
मुंबईत कसाब आणि त्याच्या साथीदारांनी केलेल्या हल्ल्याचीच या हल्ल्याने आठवण झाली. कसाब आणि त्याचा साथीदार थेट छत्रपति शिवाजी टर्मिनसच्या फलाटावर थडकला आणि आपल्या बॅगेतून रायफल काढू लागला तेव्हा गर्दीने वाहात असलेल्या या स्थानकातील प्रवाशांनाही प्रथम काही क्षण रक्ताने माखलेले पुढचे क्षण जाणवलेही नव्हते. काही लोक तर कसाब काय करतो आहे, हे मुग्ध होऊन पाहात होते. अगदी त्याचप्रमाणे हे दोघे मैदानात आले तेव्हा खेळात दंग झालेल्या मुलांनाही प्रथम वावगे काही वाटलेच नाही. त्यांनी बंदुका काढून सीआरपीएफ तळाच्या दिशेने गोळीबार सुरू केला तेव्हा मैदानातील मुलेही भीतीने थरारली.

Story img Loader