काबूलमध्ये मोठय़ा ट्रक बॉम्बच्या स्फोटात आज १५ ठार, तर २४० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. तालिबानचा प्रमुख मुल्ला ओमर हा मारला गेल्यानंतरचा हा सर्वात मोठा हल्ला असून कुठल्याही गटाने त्याची जबाबदारी घेतलेली नाही. दहशतवादी संघटनेत सत्तांतर झाल्यानंतर उन्हाळ्यात हल्ल्यांची मालिकाच सुरू करण्यात आली होती.
महिला व बालकांचा मृतांमध्ये समावेश असून पूर्व काबूलमध्ये शाह शहीद येथे हा स्फोट झाला. हा स्फोट इतका मोठा होता की, त्यामुळे शहरातील घरे हादरली व इमारती हलल्या, तसेच खिडक्यांची तावदाने तुटली. स्फोटामुळे समोरची इमारत जमीनदोस्त झाली असून स्फोटाच्या ठिकाणी १० मीटर खोलीचा खड्डा पडला आहे. मृतांची संख्या आठ झाली असून जखमींची संख्या १२८ आहे, असे काबूल पोलिसांचे प्रवक्ते अबदुल्लाह करीम यांनी सांगितले.
काबूलचे पोलिस प्रमुख जनरल अब्दुल रहमान रहिमी यांनी मृतांचा व जखमींचा आकडा निश्चित असल्याचे म्हटले असून ढिगाऱ्याखाली कुणी अडकले आहे काय याचा शोध चालू आहे. मृत व जखमींमध्ये महिला व मुलांचा समावेश जास्त आहे, कारण मार्बल स्टोन कंपनीजवळ हा स्फोट झाला असून तेथे ते कामगार म्हणून काम करीत होते. सामूहिक हत्या करण्याचा हेतू त्यामागे होता.
आरोग्य मंत्रालयाचे वहिदुल्ला मायर यांनी दिलेल्या माहितीनुसार जखमींची संख्या जास्त आहे कारण या स्फोटामुळे काचा हवेत उडाल्या आहेत. शाह शाहीद जवळ असलेल्या अफगाण नॅशनल आर्मीच्या तळाला लक्ष्य करण्याचा यामागे हेतू होता की नाही हे समजू शकले नाही. हा मध्यमवर्गीय निवासी भाग होता व त्यात परदेशी लोकांचा समावेश नव्हता. रहिमी यांनी दिलेल्या माहितीनुसार यात लष्कराचे कुणी ठार झालेले नाही. मायर यांच्या मते जखमींची रूग्णालयातील संख्या वाढत आहे. रक्तदानासाठी तातडीचे आवाहन करण्यात आले आहे.
काबूलमधील हल्ल्यात १५ ठार, २४० जखमी
काबूलमध्ये मोठय़ा ट्रक बॉम्बच्या स्फोटात आज १५ ठार, तर २४० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत.
First published on: 08-08-2015 at 03:04 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Attack in kabul fifteen dead and more than two hundred injured