उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना, बागपत जिल्ह्यातील छपरौली भागात निवडणूक प्रचारादरम्यान भाजप आमदार साहेंद्र रामला यांच्या समर्थकांवर कथितरीत्या हल्ला करण्यात आला, तसेच त्यांच्यावर शेण फेकण्यात आले.
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी, मंगळवारी घडलेल्या या घटनेच्या संबंधात पोलिसांनी तिघा जणांना ताब्यात घेतले आहे, असे बागपतचे पोलीस अधीक्षक नीरज सिंह जुदाऊँ यांनी सांगितले. ‘समाजमाध्यमांवर पसरलेल्या आमदार रमाला यांचे समर्थक दिसत असलेल्या दृश्यफितींची पोलिसांनी नोंद घेतली. त्याआधारे तिघा जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू आहे,’ असे जुदाऊँ म्हणाले. या दृश्यफितींमध्ये, मोटारींतून जाणाऱ्या या समर्थकांवर शेण फेकण्यात येत असल्याचेही दिसत होते. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा पोलीसप्रमुखांनी इतर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांसह घटनास्थळाला भेट दिली. पश्चिम उत्तर प्रदेश आणि राज्याच्या इतर भागांमध्ये भाजपच्या आमदारांना लोकांच्या नाराजीचा सामना करावा लागण्याच्या अशाच अनेक घटना घडल्यानंतर बागपत जिल्ह्यातील ही घटना घडली आहे.