तेलंगणात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. सत्ताधारी भारत राष्ट्र समिती ( बीआरएस ), काँग्रेस आणि भाजपाकडून एकमेकांवर चिखलफेक सुरू आहेत. अशातच अचमपेट येथील आमदार गव्वाला बलराजू यांच्यावर हल्ला झाला आहे. बलराजू यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. हल्ल्यानंतर अचमपेट येथे तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
शनिवारी रात्री गव्वाला बलराजू हे प्रचार संपवून निघाले होते. तेव्हा, बीआरएस आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. त्याचवेळी बलराजू यांच्यावर हल्ला करण्यात आला. हल्ल्यानंतर बलराजू यांना हैदराबाद येथील अपोलो रूग्णालयात दाखल करण्यात आलं.
बलराजू यांची मंत्री केटीआर यांनी रूग्णालयात भेट घेतली. यानंतर प्रसारमाध्यमांना माहिती देताना केटीआर म्हणाले, “दुर्दैवाने तेलंगणात हिंसाचाराच्या दोन घटना घटल्या आहेत. निवडणुकीत पराभव समोर दिसत असल्यानं विरोधकांमध्ये निराशेचं वातावरण पसरलं आहे. हल्ले करणाऱ्यांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.”
दरम्यान, ३० ऑक्टोबरला बीआरएसचे खासदार आणि विधानसभेचे उमेदवार के प्रभाकर रेड्डी यांच्या धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात त्यांच्या पोटाला जखम झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली होती.