केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या छावणीवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या आत्मघातकी हल्लेखोरांना आश्रय दिल्याच्या आरोपावरून जम्मू-काश्मीर पोलिसांनी सार्वजनिक आरोग्य विभागात मजुरीचे काम करणाऱ्या परणदीपसिंगला अटक केली आहे.
काश्मीरच्या उत्तरेकडील उरी भागात राहणारा बशीर अहमद ऊर्फ हारूनभाई हा लष्कर-ए-तोयबाचे काम करतो. त्याच्या चौकशीतून परणदीपसिंग याचे नाव पुढे आल्याने पोलीस त्याचा शोध घेत होते.
बुधवारी दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ला केल्यानंतर परणदीपसिंग पसार झाला होता. त्याला शनिवारी सकाळी पोलिसांनी पकडले. बशीर याच्यासह झुबेर(२२) यालाही चत्तबल येथून अटक करण्यात आली आहे. बशीर याने दिलेल्या सीमकार्डवरून झुबेर हॅण्डलरसोबत बोलत असतानाच त्याला अटक करण्यात आली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
बशीरने पोलीस दलाच्या शाळेची रेकी केली होती व दोघा आत्मघातकी दहशतवाद्यांना आपणच बशीरकडे आणून सोडल्याचे झुबेरने सांगितले.
लष्कर-ए-तोयबाच्या पाच दहशतवाद्यांनी उरी भागात घुसखोरी केली. त्यापैकी दोघे जण माघारी परतले तर अन्य तीन श्रीनगरकडे रवाना झाले. बशीरने त्यांची तंगमार्ग विभागात जाण्याची व्यवस्था केली. तेथे ११ मार्च रोजी ते सर्व परणदीपसिंग याच्या घरात भेटले. त्यानंतर त्यांना बेमिना भागात आणण्यात आले आणि त्यांनी आत्मघातकी हल्ला केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा