पीटीआय, कराची : पाकिस्तानमधील कराची विद्यापीठात मंगळवारी धुळवड साजरी करण्यासाठी जमलेल्या अल्पसंख्याक हिंदू विद्यार्थ्यांवर अतिरेकी विचारसरणीच्या मुस्लीम विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्यात १५ विद्यार्थी जखमी झाले आहेत. पाकिस्तानात गेल्या दोन दिवसांतील ही याप्रकारची दुसरी घटना आहे.
कराची विद्यापीठाच्या सिंधी विभागात हा प्रकार घडल्याचे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी सांगितले. त्या ठिकाणी हिंदू आणि अन्य विद्यार्थी होळीनिमित्त रंग उधळत होते. एका हिंदू मुलीने याबाबतची ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित केली आहे. हल्लेखोरांनी तेथील विद्यार्थीना त्रास देण्याचा प्रयत्न केला, असे तिने म्हटले आहे. सोमवारी पंजाब विद्यापीठातही होळी साजरी करण्यासाठी जमलेल्या विद्यार्थ्यांना आयजेटीच्या कार्यकर्त्यांनी रोखले होते. पण यात विद्यार्थी गुंतले असल्याच्या आरोपाचा विद्यापीठाच्या प्रवक्त्याने इन्कार केला आहे.