पाकिस्तानी तुरुंगात कैद असलेल्या भारतीय व बांगलादेशी कैद्यांवर पाकिस्तानी कैदी हल्ला करूच शकत नाहीत. कारण त्यांना दुसऱ्या स्वतंत्र बराकीत ठेवलेले असते तसेच त्यांची व्यवस्थाही स्वतंत्र केलेली असते. त्यामुळेच सरबजितवर झालेला हल्ला अत्यंत योजनाबद्ध असून त्यात आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचाच हात असावा असे स्पष्ट मत एका माजी भारतीय गुप्तहेराने व्यक्त केले आहे. महबूद इलाही असे या गुप्तहेराचे नाव आहे.
पाकिस्तानी तुरुंगात २० वर्षे सजा भोगलेले महबूद इलाही यांनी सरबजितच्या हत्येत आयएसआयचाच हात असल्याचे स्पष्ट केले आहे. इलाही यांनी पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्यासोबत तुरुंगवास भोगला आहे. भारतासाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून इलाही यांना १९७७ साली पाकिस्तानात अटक करण्यात आली होती. त्यांची १९९६ मध्ये सुटका करण्यात आली. त्यानंतर ते मायदेशी परतले. आपल्या २० वर्षांच्या कारावासात पाकिस्तानी तुरुंगातील परिस्थिती आपण जवळून पाहिली असल्याचे इलाही म्हणाले.
पाकिस्तानातील एका सर्वोच्च नेत्याची हत्या करण्यासाठी आयएसआयने आपल्याला कोरा धनादेशही दिला होता व भारतात पळून जाण्यासाठी मदत करण्याचे आमिषही दाखवले होते असेही इलाही म्हणाले. सरबजितवरील हल्ला हा आयएसआयचाच पूर्वनियोजित कट असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
फाशीची सजा सुनावलेल्या कैद्यांची सुरक्षाव्यवस्था पाकिस्तानी तुरुंगात अत्यंत कडेकोट असते. त्या ठिकाणी पाकिस्तानी कैदी पोहोचू शकत नाहीत. तसेच ब्लेड वा इतर धारदार शस्त्रेही त्या ठिकाणी पोहोचू शकत नाहीत. मात्र, सरबजितवर नेमका ब्लेड व धारदार शस्त्रांनीच हल्ला झाला व तुरुंग अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय हे होणे शक्यच नसल्याचे इलाही म्हणाले.
कोट लखपतमधील दुसरा बळी
पाकिस्तानातील कुप्रसिद्ध कोट लखपत कारागृहात या वर्षी मरण पावलेला सरबजित सिंग हा दुसरा भारतीय कैदी आहे. त्यापूर्वी चमेलसिंग या भारतीय कैद्याचा या कारागृहात संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला होता. कोट लखपत कारागृहात चार हजार कैदी ठेवण्याची क्षमता असताना तेथे त्यापेक्षा चार पटीने अधिक कैद्यांना ठेवण्यात आले आहे. सध्या या कारागृहात १७ हजार कैदी असून त्यामध्ये ३६ जण भारतीय कैदी आहेत.
पाकिस्तानी कैद्यांच्या सुरक्षेत वाढ
देशातील विविध कारागृहांत बंदिवान असलेल्या २७० पाकिस्तानी कैद्यांना योग्य ती सुरक्षा पुरवण्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना दिले आहेत. सरबजितवर झालेल्या हल्ल्याचा बदला म्हणून या कैद्यांवर हल्ला होऊ शकतो, अशी भीती आहे. देशभरात विविध राज्यांतील कारागृहांत २७० पाकिस्तानी कैदी आहेत. त्यातील अनेकजण दहशतवाद आणि अंमली पदार्थाच्या तस्करीशी संबंधित आहेत. या सर्व कैद्यांना संबंधित कारागृह प्रशासनाने योग्य ती सुरक्षा पुरवावी, प्रसंगी त्यांच्या सुरक्षेत वाढ करावी असे आदेश गृह मंत्रालयाने दिले आहेत.
सत्य लोकांसमोर मांडा
सरबजितची हत्या अमानवीय असून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे सरकार या प्रकरणात जनतेची दिशाभूल करीत आहे. त्यामुळे सरबजितच्या हत्येचे सत्य लोकांसमोर मांडावे. पाकिस्तानच्या या अमानवीय कृत्याचे कठोरपणे उत्तर देण्यास सरकार असमर्थ आहे.
– नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री-गुजरात
सर्व संबंध तोडून टाका
पाकिस्तानबरोबर असलेले राजनैतिक, सांस्कृतिक आणि व्यापारी संबंध तोडावेत आणि पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणून घोषित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघावर दबाव आणा.
– प्रवीण तोगडिया, विश्व हिंदू परिषद
शोकाकुल झालो
सरबजितच्या मृत्यूने शोकाकूल झालो. पाकिस्तानमधील रुग्णालयात उपचार सुरू असताना सरबजित याच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर आम्ही सगळेच अतिशय दुखी झालो.
– सलमान खुर्शीद, परराष्ट्रमंत्री
योग्य कारवाई करा
ही आंतरराष्ट्रीय स्तरावरची घटना आहे. त्यामुळे भारत सरकारने या प्रकरणी गंभीर दखल घेत योग्य ती कारवाई करावी.
– भूपिंदर हुडा, मुख्यमंत्री-हरयाणा
मारेकऱ्यांवर कारवाई करा
सरबजितवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या कैद्यांविरोधात पाकिस्तानने कारवाई करावी. पाकिस्तानने हल्लेखोरांविरुद्ध एफआयआर नोंदवावा आणि त्यांच्या देशातील कायद्यानुसार कारवाई करावी.
शब्बीर शहा, फुटीरवादी नेता
निषेधाचा सूर
सरबजीतच्या मृत्यूचे वृत्त धडकताच त्याचे देशभर तीव्र पडसाद उमटत असून अनेक ठिकाणी लोकांनी पाकिस्तानचा निषेध केला आहे. भारत-पाकिस्तानदरम्यान सुरू असलेली दिल्ली-लाहोर बससेवेचा मार्गही या घटनेमुळे बदलण्यात आला आहे. सरबजीतच्या मृत्यूच्या निषेधार्थ येथील शिवसेनेच्या राज्य शाखेचे उपाध्यक्ष इंदरजीत करवाल यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. हनुमानगढी येथून काढण्यात आलेला हा मोर्चा राष्ट्रीय महामार्ग १ वरील शुगर मिल क्रॉसिंगजवळ विसर्जित करण्यात आला. सरबजीतला वाचवण्यात भारत सरकारला आलेल्या अपयशाच्या निषेधार्थ शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी वाहतूक रोखून धरली. पाकिस्तानला या कृत्याचा भारताने सडेतोड जबाब देण्याची मागणी या वेळी निदर्शकांनी करताना उभय देशांदरम्यान सुरू असलेली रेल्वे व बससेवा तात्काळ बंद करण्यात यावी, यासाठी जोरदार घोषणाही दिल्या.
सरबजितच्या गावावर शोककळा
सरबजितचे निधन झाल्याचे वृत्त धडकताच भिखीविंड या सरबजितच्या गावावर शोककळा पसरली. सरबजितवर झालेला हल्ला व त्यानंतर गुरुवारी सकाळी आलेले त्याच्या निधनाचे वृत्त याचा गावकऱ्यांनी तीव्र निषेध करताना येथील दुकाने बंद केली. सरबजितच्या निधनाचे वृत्त गावात येऊन थडकताच अनेकांनी त्याच्या घरचा रस्ता धरला.
पंजाब सरकारची एक कोटींची मदत
सरबजितच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारने एक कोटी रुपयांची मदत पंजाब सरकारने घोषित केली असून स्वप्नदीप कौर आणि पूनम या सरबजितच्या दोन्ही मुलींना पंजाबमध्ये सरकारी नोकरी देण्यात येईल, असेही जाहीर केले आहे. सरबजितच्या मृत्यूमुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा घोषित करण्यात आला आहे. या काळात सर्व सरकारी इमारतींवरील ध्वज अध्र्यावर उतरविण्यात येतील तसेच कोणतेही सरकारी कार्यक्रम होणार नाहीत, असे अधिकाऱ्यांनी येथे सांगितले.