पीटीआय, वायनाड (केरळ) : काँग्रेसचे नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांच्या येथील कार्यालयावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात राज्यातील सत्ताधारी माकपची विद्यार्थी शाखा असलेल्या स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या (एसएफआय) १९ कार्यकर्त्यांना पोलिसांना अटक केली आहे. हा हल्ला होणार अशी माहिती मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांना होती, असा आरोप काँग्रेसने केला आहे.

विधिमंडळातील विरोधी पक्षेनेते व्ही. डी. सतिशन यांनी गांधी यांच्या कार्यालयाची पाहणी केल्यानंतर हा आरोप केला. राहुल गांधी यांना वायनाडमधून हद्दपार करण्याचा मोदी सरकारचा अजेंडा असून ती सुपारी माकपने घेतल्याचा दावा त्यांनी केला. संघ परिवाराच्या अजेंडय़ानुसार आणि केंद्रातील मोदी सरकारला संतुष्ट करण्यासाठीच विजयन यांना माहित असूनही हा हल्ला होऊ देण्यात आला, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. राज्याच्या आरोग्यमंत्री विना जॉर्ज यांचा खासगी कर्मचारी असलेली अविशिथ नावाची व्यक्ती  या  हल्लात सामील असल्याचा आरोप विरोधकांनी केल्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी खुलासा केला की, ही व्यक्ती आता त्यांच्या सेवेत नाही. वैयक्तिक कारणातून या महिन्याच्या आरंभीच या व्यक्तीने आपल्याकडील नोकरी सोडली होती, असा दावा त्यांनी केला आहे.

वनांभोवतीच्या संरक्षित क्षेत्राबाबत खासदार राहुल गांधी निष्क्रिय असल्याचा आरोप करून एफएसआय कार्यकर्त्यांनी शुक्रवारी राहुल गांधी यांच्या स्थानिक कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यावेळी या कार्यकर्त्यांनी कार्यालयाची मोडतोड केल्याचा आरोप आहे. पण आता मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रश्नावर राहुल यांनी मुख्यमंत्र्यांकडे आधीच पत्रव्यवहार करून तातडीने हस्तक्षेपाची मागणी केली होती. यावर विजयन यांनी गांधी यांना सांगितले आहे की, त्यांनी हा प्रश्न संसदेच्या आगामी अधिवेशनात उपस्थित करावा.