एपी, कीव्ह (युक्रेन) : नववर्षांच्या पूर्वसंध्येला शनिवारी रशियाने युक्रेनच्या कीव्हसह अन्य भागांतील हल्ल्यांची तीव्रता वाढविली. यात एक जण ठार, तर १४ जण जखमी झाले. मात्र या हल्ल्यांची पर्वा न करता युक्रेनचे अनेक नागरिक सुट्टय़ांमध्ये कुटुंबीयांना भेटण्यासाठी मायदेशी परतले.
रशियाकडून आता जाणीवपूर्वक नागरिकांना लक्ष्य केले जात आहे, असे युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा रशियाचा हेतू असे, असा दावा त्यांनी केला. देशात नववर्षांचे स्वागत समारंभ सुरू होण्याआधी रशियाने मोठय़ा प्रमाणावर क्षेपणास्त्र हल्ले केल्याबद्दल युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्या पत्नी ओलेना झेलेन्स्की यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दुसऱ्यांना उद्ध्वस्त करण्याची आमच्या शेजारी देशाची खोड आहे, असे त्या म्हणाल्या.
पुतिन यांचे देशवासियांना आवाहन
रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना शनिवारी आपल्या देशवासियांना आवाहन केले, की त्यांनी युक्रेनशी लढत असलेल्या आपल्या सैनिकांच्या पाठिशी उभे राहावे. आपण युक्रेनमधील ‘नवनाझीं’वर निश्चितपणे विजय मिळवू, असा दावा त्यांनी केला. रशियाला उद्ध्वस्त करण्याचा पाश्चात्य राष्ट्रांचा कावा आहे, असा आरोपही त्यांनी केला.