अत्यंत दुर्गम अशा वाळवंटात, खोलवर गुहांमध्ये माली या देशाच्या उत्तरेकडील डोंगराळ प्रदेशांत अल-कायदासह अन्य इस्लामी अतिरेकी संघटना स्वसंरक्षणार्थ यंत्रणा उभारत आहेत. बांधकाम करणाऱ्या मजुरांनी टाकून दिलेली यंत्रे, बुलडोझर आणि अन्य यंत्रणा वापरून आपली यंत्रणा प्रबळ करीत आहेत. जणू या भागात आपले राष्ट्र उभारण्याचाच त्यांचा प्रयत्न सुरू आहे.
अल-कायदाच्या नियंत्रणाखाली असलेल्या अशा अनेक गुहांपैकी एका गुहेचे वर्णन धक्कादायक आहे. एक ट्रक जाऊ शकेल इतका तिचा आकार मोठा आहे. या गुहेत १०० ड्रम पेट्रोलचा साठा करून ठेवण्यात आला आहे. परकीय आक्रमण झाल्यास बचाव करण्यासाठी आपत्कालीन संरक्षण म्हणून ही व्यवस्था करण्यात आली असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. माली या देशाचा उत्तर भाग हा अल-कायदा आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्राबल्याखाली आला आहे. जगभरात पसरलेल्या अल-कायदाच्या प्रभावक्षेत्रांचा विचार करता हा सर्वात मोठा भूप्रदेश मानावा लागेल.
मूळचा कॅनडाचा रहिवासी असलेला आणि संयुक्त राष्ट्र संघातील राजनैतिक अधिकारी असलेल्या रॉबर्ट फ्लॉवर याचे अल-कायदाकडून अपहरण झाले होते. १३० दिवस तालिबान्यांच्या कैदेत काढणाऱ्या रॉबर्टच्या मते अफगाणिस्तानवर अल-कायदा आपले संपूर्ण वर्चस्व कधीच प्रस्थापित करू शकले नव्हते, उलट उत्तर मालीवर मात्र त्यांचे संपूर्ण नियंत्रण आहे. त्यामुळे अल-कायदाचा सर्वात महत्त्वाचा तळ म्हणून उत्तर माली ‘आकार’ घेत आहे, असे रॉबर्ट यांनी सांगितले.
माली या देशातील आर्थिक दुरवस्था, सामरिकदृष्टय़ा महत्त्वाचा असलेला जंगली प्रदेश तसेच आफ्रिकेत असलेले अल-कायदा समर्थक या पाठबळावर ही दहशतवादी संघटना या प्रदेशात फोफावत आहे. या देशांतील राजकीय अस्थैर्य या दृष्टीने पोषक ठरत आहे. किंबहुना इस्लामवाद्यांनीच नऊ महिन्यांपूर्वी स्थिर असलेल्या मालीसारख्या देशाचे एका अस्थिर राष्ट्रांत रूपांतर केले आहे.
कनिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांकडून मालीमधील लोकशाही उलथवून लावली गेल्यामुळे संरक्षण दलाच्या नियंत्रण व्यवस्थेसही सुरुंग लागला आहे. आणि याच अराजकतेचा फायदा घेऊन अल-कायदा आणि त्यांचे सहकारी शहरामागून शहरे ताब्यात घेऊ लागले आहेत, असे राजकीय निरीक्षक तसेच सामरिकतज्ज्ञांनी सांगितले.
अल-कायदाच्या नियंत्रणाखाली आज सुमारे ६ लाख २० हजार चौरस कि.मी.चा प्रदेश असून फ्रान्स किंवा टेक्सास प्रांतापेक्षा हे आकारमान जास्त आहे. आणि म्हणूनच अल-कायदा उत्तर मालीमध्ये जणू स्वत:चे राष्ट्र उभारीत आहे, असा इशारा दिला जात आहे. त्यांचे स्थान आणि कार्यपद्धती पाहता या दुर्गम प्रदेशांतून त्यांना हुसकावून लावणे अफगाणिस्तानातून तालिबान्यांना हुसकावून लावण्यापेक्षाही अवघड आहे, असे सुरक्षाविषयक अभ्यासकांचे मत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा