बाळासाहेब जवळकर
राष्ट्रवादीचे पार्थ पवार, शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांच्यातील लढतीकडे राज्याचे लक्ष
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा नातू आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुत्र पार्थ निवडणूक रिंगणात असल्याने मावळ लोकसभेच्या लढतीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. गेल्या वेळी दीड लाखाहून अधिक मताधिक्याने निवडून आलेले खासदार श्रीरंग बारणे यंदा पुन्हा रिंगणात असून त्यांच्यापुढे पवारांनी आव्हान निर्माण केले आहे. संपूर्ण पवार कुटुंबीय पार्थच्या प्रचारात उतरल्याने ही निवडणूक चुरशीची तितकीच रंगतदार झाली आहे.
पुणे जिल्हय़ातील मावळ, चिंचवड, पिंपरी आणि रायगड जिल्हय़ातील कर्जत, पनवेल, उरण असे सहा विधानसभा मतदारसंघ मावळ लोकसभेत समाविष्ट आहेत. शहरी-ग्रामीण असे संमिश्र चित्र असणाऱ्या मतदारसंघात पिंपरी-चिंचवडचे ७० टक्के क्षेत्र समाविष्ट आहे. भाजप, शिवसेना, शेकाप आणि राष्ट्रवादी या पक्षांची वेगवेगळय़ा ठिकाणी प्रभावक्षेत्रे आहेत.
खासदार बारणे आणि भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्यातून विस्तव जात नव्हता. शिवसेनेने बारणेंना उमेदवारी देऊ नये, यासाठी जगतापांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले.
मात्र, उमेदवारी कायम ठेवण्यात बारणे यशस्वी झाले. घाटाखाली असलेली शेकापची ताकद आणि पिंपरीत भाजप-शिवसेनेच्या तीव्र वादाचा फायदा घेण्यासाठी अजित पवारांनी पार्थच्या उमेदवारीचे गणित मांडले.
बारणे आणि जगताप यांच्यातील संघर्षांमुळे बराच काळ संभ्रमावस्था होती. अनेक दिग्गजांना मध्यस्थी करावी लागली. त्याचा परिणाम म्हणून मोक्याच्या क्षणी त्यांच्यात दिलजमाई झाली, ती युतीच्या पथ्यावर पडली.
पार्थ पवार यांचा मावळच्या राजकारणाशी काहीही संबंध नाही. अजित पवार हेच उमेदवार असल्यासारखे चित्र आहे. १९९१ पासून पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात सक्रिय असणाऱ्या अजित पवारांची पिंपरी पालिकेत १५ वर्षे एकाधिकारशाही होती. त्यांच्याच तालमीत तयार झालेल्या लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे या आमदारद्वयीने त्यांच्याकडून पालिका खेचून भाजपकडे आणली. त्यामुळे पाच वर्षांपूर्वीपर्यंत अस्तित्वासाठी झगडणाऱ्या भाजपची ताकद वाढली आहे. भाजपमध्ये मोठी गर्दी झाली असून त्यात पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादीतून आलेल्यांचा भरणा जास्त आहे. ज्यांचे मूळ राष्ट्रवादीत आहे, त्यांच्यावर पवारांची भिस्त आहे.
बारणे कार्यक्षम खासदार असून उत्तम कामगिरीमुळे त्यांना पाच वेळा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाला. रेल्वे, संरक्षण खात्याच्या प्रश्नांसह नवीन विमानतळासाठी त्यांनी पाठपुरावा केला. किल्ल्यांचे संवर्धन, पर्यटनाला चालना दिली. क्रांतिवीर चापेकरांच्या नावाचे टपाल तिकीट सुरू केले. पिंपरीत पासपोर्ट केंद्र आणले. पवनेचा साचलेला गाळ वैयक्तिकरीत्या काढून घेतला. दुसरीकडे, पार्थ पवार यांच्याकडे आडनावाशिवाय सांगण्यासारखे काहीही नाही. पिंपरी-चिंचवडकरांनी पवारांना नाकारले असून त्याची पुनरावृत्ती मावळ लोकसभेतही होईल.
– योगेश बाबर, शहरप्रमुख, शिवसेना
खासदार म्हणून बारणे यांना छाप पाडता आलेली नाही. मतदारसंघात खासदार निधीतून कामे झाली नाहीत. पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांनी त्यांना भरभरून मते दिली, मात्र शहरवासीयांसाठी त्यांनी काही केले नाही. नद्यांची दुरवस्था कायम आहे. प्रवासी वाहतुकीचे प्रश्न गंभीर आहेत. पार्थची उमेदवारी लादलेली नसून कार्यकर्ते आणि मित्र पक्षांच्या आग्रहामुळे दिली आहे. पार्थ खासदार म्हणून उत्तम कामगिरी करतील.
– संजोग वाघेरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी