उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, तथा समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांचे आज (१० ऑक्टोबर) ८२ व्या वर्षी निधन झाले. मागील काही दिवसांपासून गुरुग्राममधील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. देशाच्या राजकारणातील एक अभ्यासू व्यक्तीमत्त्व हरवले आहे. मुलायमसिंह यांच्या निधनामुळे देशाची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे, अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनीदेखील समाजमाध्यमावर जुने फोटो शेअर करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मात्र भाजपाचे नेते तथा आमदार अतुल भातखळकर यांनी केलेल्या एका ट्वीटमुळे सर्व स्तरातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा >>> निवडणूक एका जागेसाठी पण मैदानात उतरवले ८४ आमदार १८ खासदार; भाजपाच्या पराभवासाठी कसली कंबर
मुलायमसिंह यादव यांच्या निधनानंतर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी मुलायमसिंह यांचा रुग्णालयात उपचार घेत असतानाचा फोटो शेअर केला आहे. सोबतच त्यांनी “कारसेवकांवर गोळ्या झाडणारे मुलायमसिंह यादव यांचे निधन झाले. अयोध्येत राम मंदिराची निर्मिती ते पाहून गेले. प्रभू राम त्यांच्या आत्म्याला उत्तमगती देवो,” असे विधान ट्वीटच्या माध्यमातून केले आहे. मुलायमसिंह यादव यांच्या निधनानंतर भातखळकर यांनी त्यांच्या आत्म्याला उत्तमगती लाभो असे विधान केल्यामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. एखाद्या व्यक्तीच्या निधनापश्चात तिच्यावर टीका करणे योग्य नाही, अशा आशयाच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.
हेही वाचा >>> कारसेवकांवर गोळीबार ते स्वत:च्याच मृत्यूची घोषणा करण्याचे आदेश; मुलायम सिंह यांच्या आयुष्यातील पाच लक्षवेधी प्रसंग
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले दु:ख
मुलायमसिंह यादव यांच्या निधनाच्या वृत्तानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. मुलायमसिंह यादव यांनी उत्तर प्रदेशच्या आणि राष्ट्रीय राजकारणामध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. आणीबाणीच्या काळात ते लोकशाहीसाठी लढणारे महत्त्वाच्या नेतृत्वांपैकी एक होते. संरक्षणमंत्री म्हणून त्यांनी सक्षम भारत घडवण्यासाठी काम केलं, अशा भावना मोदी यांनी आपल्या शोकसंदेशात व्यक्त केल्या.
कारसेवकांवर गोळी चालवण्याचे दिले होते आदेश
१९८९ मध्ये मुलायमसिंह यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. ९०च्या दशकाच्या सुरुवातीला देशभरात मंडल-कमंडल असा संघर्ष सुरू झाला होता. यादरम्यान,उत्तर प्रदेशमध्ये ३० ऑक्टोबर १९९० रोजी कारसेवकांचा जमाव अनियंत्रित झाला होता. यावेळी मुख्यमंत्री म्हणून मुलायमसिंह यादव यांनी पुढील विध्वंस टाळण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना गोळीबार करण्याचे आदेश दिले होते. त्याच्या दोन दिवसानंतर २ नोव्हेंबर १९९० रोजी हजारो कारसेवक हनुमान गढीजवळ पोहोचले होते. यावेळीही मुलायमसिंह यादव यांनी पोलिसांना पुन्हा एकदा गोळीबार करण्याचे आदेश दिले होते.