Atul Kulkarni on Donald Trump’s Statement : डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सूत्रे हाती घेतल्यानंतर धक्कादायक निर्णयांचा धडका लावला आहे. त्या धक्कादायक निर्णयांपैकी एक म्हणजे त्यांनी जगभरातील अनेक देशांवर परस्पर आयात शुल्क (टॅरिफ) लावलं आहे. त्यामुळे अनेक देशांचे शेअर बाजार गडगडले आहेत. पाठोपाठ ट्रम्प यांनी चीनबरोबर थेट टॅरिफ वॉर सुरू केलं आहे. दुसऱ्या बाजूला अमेरिकेच्या दडपशाहीला एकत्रितपणे प्रतिकार करण्याचं आवाहन चीनने केलं आहे. तर, बाकीचे लहान मोठे देश या नव्या आव्हानाला कसं तोंड द्यायचं यावर चिंतन करत आहेत. अशातच ट्रम्प यांनी एक वक्तव्य करून कोणत्याही देशाचं व राष्ट्रप्रमुखाचं नाव न घेता इतर राष्ट्रांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरचा केवळ इतर देशांवर नव्हे तर अमेरिकेवरही परिणाम झाला आहे. तिथला शेअर बाजार देखील घसरला आहे. अशातच त्यांचा निर्णय अमेरिकन जनतेला पटवून देताना ते म्हणाले, “मी अनेक देशांकडे पाहतोय, जे आता अमेरिकेसमोर लोटांगण घालण्याच्या मूडमध्ये आहेत. मी इथे कोणाचंही नाव घेणार नाही. मी केवळ परिस्थिती सांगतोय.”
नॅशनल रिपब्लिकन काँग्रेसनल कमिटीसमोर केलेल्या भाषणात ट्रम्प म्हणाले, “मी तुम्हाला सांगतो, हे सगळे देश आता आपल्या नावाचा जप करतायत, माझी पाठ थोपटत आहेत. व्हाइट हाऊसमध्ये फोन करत आहेत. They are kissing my A**.”
किती देशांच्या प्रमुखांनी ट्रम्प यांच्या भाषेचा निषेध केला? अतुल कुलकर्णीचा प्रश्न
दरम्यान, ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर जगभरातील कुठल्याही देशाने, राष्ट्रप्रमुखाने त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. यावरून अभिनेता अतुल कुलकर्णी याने एक टिप्पणी करत सर्वच राष्ट्रप्रमुखांना चिमटा काढला आहे. अतुलने एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने म्हटलं आहे की “हे सगळे देश आम्हाला फोन करताहेत. माझ्या पार्श्वभागाचा मुका घेताहेत, असं वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. त्यांच्या यादी मधल्या किती देशांच्या प्रमुखांनी निदान या भाषेचा तरी निषेध केला कुणास ठाऊक.”
अमेरिका-चीनमधील व्यापारयुद्ध आणखी भडकणार?
अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारयुद्ध ओसरण्याऐवजी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. अमेरिकेने चीनवर गुरुवारी लादलेल्या १४५ टक्के आयातशुल्काला प्रत्युत्तर म्हणून शुक्रवारी चीननेही अमेरिकेतून आयात होणाऱ्या वस्तूंवर ८४ टक्क्यांऐवजी १२५ टक्के आयातशुल्क आकारण्याची घोषणा केली आहे.