Atul Subhash Case: बंगळुरूमध्ये काम करणारे अभियंता अतुल सुभाष यांनी काही दिवसांपूर्वी पत्नी आणि पत्नीच्या नातेवाईकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेची देशभरात मोठी चर्चा झाली. अतुल सुभाष (Atul Subhash) यांनी पत्नी आणि नातेवाईकांवर गंभीर आरोप केले आहेत. अतुल सुभाष यांनी आपलं जीवन संपवण्याच्या काही तास आधी एक व्हिडीओ बनवत हे आरोप केले. यानंतर या प्रकरणाची सोशल मीडियावर देखील मोठी चर्चा झाली. यानंतर अतुल सुभाष यांच्या पत्नीसह पत्नीच्या नातेवाईकांना पोलिसांनी अटक केली आहे, तर अतुल सुभाष यांचे कुटुंबीय न्यायाची मागणी करत आहेत.
या प्रकरणी आता काही सामाजिक कार्यकर्त्यांनी काँग्रेस नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा ताफा रस्त्याने जात असताना न्यायाची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणामध्ये न्याय मिळण्यासाठी आवाज उठवण्याचं आवाहन काही सामाजिक कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांना केलं असून यासंदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेही वाचा : संसदेबाहेर आखाडा! खासदारांमध्ये धक्काबुक्की; राहुल गांधींविरोधात गुन्हा
काय आहे व्हिडीओ?
दीपिका नारायण भारद्वाज या नावाच्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. तसेच व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, खासदार राहुल गांधी यांचा ताफा रस्त्याने जात असताना आम्ही अतुल सुभाष यांच्या प्रकरणामध्ये न्यायाची मागणी केली आहे. यावेळी राहुल गांधींनी गाडीची काच खाली करत मुद्दा विचारला असता या सामाजिक कार्यकर्त्यांनी अतुल सुभाष यांच्या घटनेबाबत राहुल गांधींना गुगलवर सर्च करण्यास सांगितलं. तसेच एकाही खासदाराने हा मुद्दा उपस्थित केला नाही, असं सांगत आवाज उठवण्याचं आवाहन केल्याचं व्हिडीओत दिसत आहे. तसेच राहुल गांधी या प्रकरणी आवाज उठवतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. तसेच अतुल सुभाष प्रकरणात राहुल गांधी आवाज उठवतील की नाही? हे सांगता येणार नाही. आशा आहे की कोणीतरी या मुद्दा संसदेत मांडेल, असंही या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्यांनी अतुल सुभाष यांच्या घटनेबाबत राहुल गांधींना सांगितल्यानंतर त्यांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि चालु गाडीमधून एक चॉकलेट फेकलं.
No Parliamentarian has spoken about tragic suicide by #AtulSubhash and the reasons behind suicides by so many men in India
— Deepika Narayan Bhardwaj (@DeepikaBhardwaj) December 18, 2024
When we were on our way to the condolence meeting in Delhi, we happened to spot @RahulGandhi on the highway and despite his entourage shouting at us, told… pic.twitter.com/enxW3Ubbws
नेमकं प्रकरण काय?
अतुल सुभाष यांचा मृतदेह बंगळुरूतील त्यांच्या राहत्या घरी आढळून आला होता. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला. त्यावेळी पोलिसांना २४ पानांची सुसाईड नोट सापडली होती. त्याचबरोबर अतुल सुभाष यांनी जवळपास ९० मिनिटांचा एक व्हिडीओही रेकॉर्ड केला होता. या व्हिडीओमध्ये त्यांनी पत्नीवर मानसिक छळ केल्याचे आरोप केले होते. यानंतर घरगुती हिंसाचारासंदर्भातले कायदे, महिलांच्या बाजूने केला जाणारा विचार आणि पुरुषांवरील मानसिक ताण याबाबत मोठी चर्चा सुरू झाली.
अतुल सुभाष यांनी आपल्या पत्रात आणि व्हिडीओमध्ये अनेक गंभीर आरोप पत्नीवर केले. पत्नी आपला छळ करत असून आपल्याविरोधात ८ खोट्या पोलीस तक्रारी तिनं दाखल केल्याचा आरोप केला होता. पत्नीच्या घरच्या मंडळींकडून पैशांसाठी आपला जाच केला जात असल्याचं त्यांनी व्हिडीओमध्ये म्हटलं. घटस्फोट हवा असल्यास ३ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली, मुलाला भेटण्यासाठीही पैसे मागितले, असा दावा त्यांनी व्हिडीओत केला होता.
पत्नीने सर्व आरोप फेटाळले
दरम्यान, अतुल सुभाष यांच्या पत्नीची पोलिसांनी चौकशी केली असता आपल्या जबाबात तिने सर्व आरोप फेटाळले आहेत. अतुलच आपला छळ करत होता, असं पत्नीने जबाबात म्हटल्याचं वृत्त बिझनेस टुडेनं दिलं आहे. तसेच, “मी गेल्या तीन वर्षांपासून अतुलपासून वेगळी राहात होते. जर मी खरंच पैशांसाठी त्याचा छळ केला असता, तर इतका काळ मी त्याच्यापासून वेगळी राहिलेच नसते”, असा दावा अतुल सुभाष यांच्या पत्नीने केला आहे.