Atul Subhash Father Video : बंगळुरू येथील सॉफ्टवेयर अभियंता अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. अतुल सुभास यांनी पत्नी निकीता सिंघानिया आणि सासरच्या मंडळीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. मात्र जीवन संपवण्याआधी त्यांनी दीड तासाचा व्हिडीओ आणि २४ पानी सुसाईड नोटमध्ये याबद्दल सविस्तर माहिती दिली होती. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर अतुल यांची पत्नी निकिता सिंघानिया आणि तिचे कुटुंबिय फरार झाले होते. अखेर रविवारी सकाळी त्यांना अटक करण्यात आली आहे. बंगळुरू पोलीसांनी अतुल यांच्या पत्नीला गुरुग्राम येथून तर आई निशा सिंघानिया आणि भाऊ अनुराग सिंघानिया यांना प्रयागराज येथून ताब्यात घेतले.

या घडामोडीदरम्यान अतुल यांचे वडील आणि भावाने अतुल यांच्या ४ वर्षीय मुलाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. अतुल सुभाष यांच्या वडि‍लांचा व्हिडीओ समोर आला असून यामध्ये ते आपल्या नातवाबद्दल चिंता व्यक्त करताना दिसत आहेत.

अतुल सुभाष यांचे वडील काय म्हणालेत?

एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना अतुल यांचे वडील पवन कुमार मोदी म्हणाले की, “तिने आमच्या नातवाला कुठे ठेवलंय हे आम्हाला माहिती नाही. त्याला मारून टाकलं, की तो जिंवत आहे? हेही आम्हाला माहिती नाही. माझी फक्त एवढीच विनंती आहे की आमचा नातू आमच्याबरोबर राहावा.”

अतुल यांच्या वडीलांनी यावेळी न्यायव्यवस्थेचे आभार मानले. तसेच त्यांनी आपण स्वत:च्या नातवाला कधी मांडीवरही घेतलं नाही, त्यांचं बोलणं फक्त व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून होत असे असंही सांगितलं. याबरोबरच निकीता सिंघानियाच्या कुटुंबियांनी नातवाच्या नावाने एक नवीन केस दाखल केल्याचेही अतुल सुभाष यांच्या वडिलांनी सांगितले.

ते म्हणाले की, “नातवाच्या नावाने माझ्यावर एक नवीन केस दाखल करण्यात आली आहे… तिचे ४० हजारातही पोट भरत नाही म्हणून केस दाखल करण्यात आली आहे…आपले पंतप्रधान मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, आरजेडी नेते तेजस्वी यादव यांना एकच विनंती आहे की माझा नातू मला सोपवावा, माझी दुसरी काहीच मागणी नाही… मी कधी बंगळुरूला गेलो नाही, मी त्याला कसं पाहाणार.. मी त्याला फक्त व्हिडीओ कॉलवरच पाहिलं आहे, कधी मांडीवरही घेतलं नाही…. एका आजोबांसाठी त्याचा नातू हा त्याच्या मुलापेक्षाही जास्त असतो.”

अतुल सुभाष आत्महत्या प्रकरण काय आहे?

अतुल सुभाष (वय ३४) हे बंगळुरूमधील ऑटोमोबाइल कंपनीत वरिष्ठ पदावर काम करत होते. अतुल यांनी ९ डिसेंबर रोजी पत्नी आणि सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी ८१ मिनिटांचा व्हिडीओ रेकॉर्ड केला असून २४ पानांची सुसाइड नोट लिहिली आहे. या नोटमध्ये त्यांनी आपल्या शेवटच्या १२ इच्छा व्यक्त केल्या आहेत. अतुल सुभाष यांच्यावर त्यांच्या पत्नीने नऊ गुन्हे दाखल केले होते. न्यायालयीन प्रक्रियेला कंटाळून अतुल सुभाष यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जाते.सुभाष यांच्याविरोधात खून, हुंड्यासाठी छळ, अनैसर्गिक लैंगिक अत्याचार अशा प्रकारचे नऊ गुन्हे दाखल करण्यात आले होते. यातील काही गुन्ह्यात अतुल सुभाष यांच्या कुटुंबियांचीही नावे दाखल झाली होते. दरम्यान अतुल यांचा व्हिडीओ समोर आल्यानंतर देशभरातून या प्रकरणी संताप व्यक्त होत आहे. तसेच आरोपींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Story img Loader