Atul Subhash Nikita Singhania Case : बंगळुरुमधील तंत्रज्ञ अतुल सुभाष यांनी पत्नीवर छळाचे आरोप करत आत्महत्या केली होती. त्यानंतर अतुल यांच्या पत्नीविरोधात देशभरात संतापाची लाट उसळली आहे. समाज माध्यमांवरही अनेकजण अतुल यांच्या समर्थनार्थ उतरले असून, अतुल यांच्या पत्नीवर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. अशात आता पत्नी निकिताने अतुल यांच्या विरोधात २४ एप्रिल २०२२ मध्ये दाखल केलेली पोलीस तक्रार समोर आली आहे. ज्यात निकिताने पती अतुल तिला मारहाण करायचा असा आरोप केला आहे. याचबरोबर अतुल तिला जनावरासारखे वागवायचा असेही तक्रारीत म्हटले आहे. याबाबत वृत्तसंस्था पीटीआयने वृत्त दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हुंड्यासाठी छळाचा आरोप

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, निकिताने पोलीस तक्रारीत सांगितले होते की, तिचा आणि अतुल सुभाष यांचा २६ एप्रिल २०१९ मध्ये विवाह झाला होता. त्यावेळी माझ्या माहेरच्या लोकांनी लग्नात जे काही दिले होते, त्याबाबत अतुल आणि त्याचे पालक समाधानी नव्हते. त्यामुळे त्यांनी दहा लाखांची मागणी केली होती.

निकिताने तक्रारीत पुढे म्हटले की, “लग्नानंतर सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी माझा मानसिक आणि शारीरिक छळ करायला सुरुवात केली. जेव्हा याबाबत मी माझ्या पालकांना सांगितले, तेव्हा ते म्हणाले काही दिवसांत सर्व सुरळीत होईल. पण सासू-सासऱ्याच्या वागणुकीत कोणताही बदल झाला नाही.”

जनावरासारखी वागणूक

निकिताने दिलेल्या पोलीस तक्रारीत असेही म्हटले आहे की, “माझा पती मद्यपान केल्यानंतर मला मारहाण करायचा. तो मला जनावरासारखे वागवायचा. मला धमकी देत माझा सर्व पगार त्याच्या बँक खात्यात ट्रान्सफर करायचा.” या तक्रारीत निकिताने, तिचा सासरकडच्या लोकांकडून होत असलेल्या छळामुळे वडिलांची तब्येत बिघडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोपही केला आहे.

हे ही वाचा : कोण आहे अतुल सुभाष यांची पत्नी निकिता? जिच्यावर २४ पानांचे आरोप करत पतीने संपवले होते जीवन

आत्महत्येपूर्वीच अतुल सुभाष यांचे आरोपांना उत्तर

अतुल सुभाष यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात पत्नी निकिताने पोलीस तक्रारीत केलेल्या आरोपांना उत्तर दिले होते. अतुल त्यांच्या पत्रात म्हणाले होते की, “आम्ही निकिताला १० लाख रुपये मागितल्याचा आरोप हस्यास्पद आहे. माझी पत्नी म्हणाली होती की, तिने आमचे घर सोडताना मला ४० लाख रुपये वार्षिक पगार होता. त्यानंतर माझा पगार ८० लाख रुपये झाला होता. वर्षाला ४० किंवा ८० लाख रुपये कमवाणार व्यक्ती पत्नी आणि मुलाला सोडून १० लाख रुपयांची मागणी का करेल.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Atul subhash treated me like a animal bengaluru techie wife nikita singhania in dowry harassment complaint aam