Atul Subhash Sucide Case : बेंगळुरूतील तंत्रज्ञ अतुल सुभाष यांच्या आत्महत्या प्रकरणात, त्यांची पत्नी निकिता आणि सासरच्या लोकांना आज बेंगळुरू न्यायालयाने जामीन मंजूर केला. या सर्वांवर अतुल सुभाष यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप होता. अतुल सुभाष यांनी पत्नी आणि सासरच्या लोकांनी छळ केल्याचा आरोप करत ९ डिसेंबर रोजी आत्महत्या केली होती.

अतुल सुभाष यांची पत्नी निकिता सिंघानिया, तिची आई निशा सिंघानिया आणि भाऊ अनुराग सिंघानिया या प्रकरणात बंगळुरू पोलिसांच्या ताब्यात होते. जामीन मिळावा म्हणून त्यांनी बेंगळुरूतील सत्र न्यायालयात धाव घेतली होती. आरोपींनी यापूर्वी कर्नाटक उच्च न्यायलयात धाव घेत या प्रकरणातील याचिका निकाली काढण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी केली होती. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर सत्र न्यायालयाने आज ही याचिका निकाली काढली.

काय आहे प्रकरण?

तंत्रज्ञ अतुल सुभाष यांनी गेल्या महिन्यात बेंगळुरूमधील एका फ्लॅटमध्ये गळफास घेऊन जीवन संपवले होते. ३४ वर्षीय अतुल सुभाष हे बेंगळुरू शहरात एका खासगी कंपनीत चांगल्या पदावर काम करत होते. अतुल सुभाष यांनी आत्महत्या करण्याआधी २४ पानी पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी पत्नी आणि पत्नीच्या नातेवाईकांवर छळ केल्याचे गंभीर आरोप केले आहेत.

अतुल सुभाष यांनी त्यांच्या पत्रात केलेल्या आरोपांनुसार, पत्नीने घटस्फोटाचे प्रकरण निकाली काढण्यासाठी त्यांच्याकडे तब्बल ३ कोटी रुपयांची मागणी केली होती. एवढंच नाही तर मुलाच्या संगोपन आणि देखभालीसाठी वेगळी रक्कम मागितली होती. या प्रकरणी अतुल सुभाष यांनी न्यायाची मागणी करत एक व्हिडिओ देखील चित्रित केला होता. तसेच पत्नीने आपल्यावर अनेक खोटे गुन्हे दाखल करत आपला खूप छळ केल्याचा गंभीर आरोप केले होते.

हे ही वाचा : Mukesh Chandrakar : पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या हत्येतील आरोपीच्या घरावर बुलडोझर कारवाई, छत्तीसगड सरकारचा आक्रमक पवित्रा

अतुल सुभाष आणि निकिता यांचा प्रेमविवाह झाला होता. या दोघांची २०१९ मध्ये एका विवाह संकेतस्थळावर ओळख झाली होती. त्यानंतर त्यांनी २०२१ मध्ये विवाह केला होता. विवाहानंतर सुरुवातीचे काही दिवस त्यांच्यामध्ये सर्वकाही सुरळीत होते. पण, काही दिवसांनी परिस्थिती बिघडली. दरम्यान अतुल यांनी टोकाचे पाऊल उचलल्यानंतर त्यांची पत्नी निकिताची आता देशभरात चर्चा होत आहे. अतुल यांनी पत्नीवर पत्र आणि व्हिडिओच्या माध्यमातून अनेक गंभीर आरोप केले आहेत.

Story img Loader