गोव्यातील बंदरे आणि विविध जेटींवर असलेल्या सहा लाख टनाच्या लोहखनिजाची लिलावाद्वारे विक्री करण्याच्या प्रक्रियेस येत्या १० मेपासून प्रारंभ होणार आहे. सदर लिलाव ऑनलाइन पद्धतीने होईल, अशी माहिती खाण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली.
मार्मागोवा पोर्ट ट्रस्ट आणि इतर जेटींवर असलेल्या या सुमारे सहा लाख टनी लोहखनिजांचा लिलाव करण्यात येणार असल्याचे खाण विभागाचे संचालक प्रसन्न आचार्य यांनी सांगितले. त्यासाठी खाण विभागाकडून अधिसूचनाही जारी करण्यात आल्याचे ते म्हणाले. अशा प्रकारे लिलावात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांसाठी १२ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. ऑनलाइन लिलावाद्वारे राज्याने याआधी १७ फेब्रुवारी व ५ मार्च रोजी १.६१ दशलक्ष टन लोहखनिजाची विक्री करून २६०.६८ कोटी रुपयांचा महसूल मिळविला आहे.
 राज्यातील बेकायदा खाणींसंबंधी सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू असताना लोहखनिजाची ऑनलाइन पद्धतीने लिलावाद्वारे विक्री करण्यास न्यायालयाने अनुमती दिली होती. त्यानंतर अंतिम सुनावणीच्या वेळी अशा प्रकारच्या लिलावाद्वारे जमा झालेला महसूल सरकारी तिजोरीत जमा झाला पाहिजे, असेही निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.
मेटल स्क्रॅप ट्रेडिंग कॉर्पोरेशनतर्फे हा लिलाव होणार असून त्यावर सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीची देखरेख राहणार आहे. लोहखनिजाची ऑनलाइन लिलावाद्वारे विक्री झाल्यानंतर राज्यातील आर्थिक उलाढालींना मोठा वेग येईल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनीही अलीकडेच नमूद केले होते. राज्यातील विविध जेटी, बंदरे तसेच मार्मागोवा पोर्ट ट्रस्टजवळ सुमारे १५ दशलक्ष लोहखनिज पडून आहे.

Story img Loader