सत्ताधारी पक्षास पराभव मान्य
म्यानमारमध्ये आँग सान स्यू की यांच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी (एनएलडी) या पक्षाने निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. म्यानमारमधील काही दशकांची लष्करी सत्ता आता संपुष्टात येईल असे चित्र आहे. सत्ताधारी पक्षाच्या प्रमुख नेत्यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे.

१९९० मध्ये स्यू की यांच्या पक्षाने प्रथमच निवडणुकीत भाग घेतला होता. या निवडणुकीत ८० टक्के मतदान झाल्यामुळे मतदारांनी लष्करी राजवटीच्या विरोधात कौल दिला असल्याचे संकेत होते. किमान पन्नास वर्षे या देशात लष्कराने राज्य केले. त्यात मतभेदाचे सूर काढणाऱ्यांना ठार करण्यात आले, काहींना तुरुंगात टाकण्यात आले. प्रचंड भ्रष्टाचार व चुकीची आर्थिक धोरणे यामुळे देश डबघाईस आला होता. २०११ नंतर तेथे निमलष्करी राजवट होती. रविवारच्या निवडणुकीचे निकाल सोमवारी सुरू झाल्यानंतर एनएलडीची आघाडी स्पष्ट झाली होती. मंगळवारी दुपापर्यंत पक्षाने कनिष्ठ सभागगृहाच्या ८८ पैकी ७८ जागा जिंकल्या होत्या. स्यू की यांनी सांगितले, की या बहुमताने लोकशाही बळकट होईल. केंद्रात ७५ टक्के जागा मिळतील, असा विश्वास त्यांनी बीबीसीशी बोलताना व्यक्त केला. सत्ताधारी युनियन सॉलडॅरिटी अँड डेव्हलपमेंट पक्षाने (यूएसडीपी) मार खाल्ला असून त्यांना ४४० सदस्यांच्या सभागृहात केवळ पाच जागा मिळाल्या आहेत. पक्षाचे नेते की विन यांनी नेपायीडॉ येथील मुख्यालयात सांगितले, की आमचा पराभव झाला असून एनएलडीने घवघवीत यश मिळवले आहे. आता त्यांनी काम करावे. आँग सान स्यू की यांनी जबाबदारी घेऊन काम करून दाखवावे. मी त्यांचे अभिनंदन करतो. की विन हे निवृत्त लष्करी अधिकारी असून एनएलडीला आता स्पष्ट बहुमत आहे. निवडणूक अधिकारी फार हळूहळू निकाल जाहीर करीत आहेत.

म्यानमारमध्ये २५ टक्के संसदीय जागा लष्करासाठी असतात. अजूनही एनएलडी पक्षाला निवडणूक आयोगाकडून लाचखोरी होण्याची भीती वाटते आहे. एनएलडीला बहुमतासाठी ६७ टक्के जागांची आवश्यक आहे. परदेशात जन्मलेली मुले असलेल्या व्यक्तीला अध्यक्ष होता येणार नाही असे कलम तेथील राज्यघटनेत आहे. ते बदलता आले तरच स्यू की अध्यक्ष होऊ शकणार आहे.

Story img Loader