ऑस्ट्रेलियातल्या सिडनीमध्ये असलेल्या एका शॉपिंग मॉलमध्ये हल्लेखोराने अनेक लोकांवर चाकू हल्ला करुन गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. माध्यमांनी केलेल्या दाव्यानुसार वेस्टफिल्डमॉलमध्ये हा हल्ला झाला आहे. पोलिसांनी उत्तरादाखल केल्या कारवाईत चाकू हल्ला करणाऱ्याला गोळी लागली आहे. घटनास्थळापासून स्थानिकांनी दूर रहावं असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. पोलिसांनी या भागातून लोकांना बाहेर काढलं आहे. मॉलच्या बाहेर रुग्णवाहिका आणि पोलिसांच्या व्हॅन्सची गर्दी झाल्याचं दिसतं आहे. ANI ने हे वृत्त दिलं आहे.
प्रत्यक्षदर्शींनी काय म्हटलं आहे?
या घटनेत प्रत्यक्षदर्शींनी जी माहिती दिली त्यांनी असं सांगितलं आहे की पोलिसांनी अनेक जखमींना वाचवलं आहे. तसंच मॉलमध्ये आम्ही होतो. मॉलच्या जमिनीवर रक्ताचा सडा पडला होता. आज ही घटना घडली त्यानंतर पोलीस आले, त्यांनी अनेकांना तिथून बाहेर काढलं. हल्लेखोर कोण होता? त्याने हे सगळं का केलं याचा तपास सुरु असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार एका मुलीने तिच्या आई वडिलांना केलेल्या मेसेजमध्ये हे लिहिलं आहे की तिने मॉलमध्ये गोळीबाराचा आवाज ऐकला. मी माझा जीव वाचवण्यासाठी एका शोरुममध्ये लपले आहे असं या मुलीने म्हटलं आहे. मॉलमध्ये चाकू हल्ला आणि गोळीबार झाल्यानंतर अनेक लोकांनी दुकानंच शटर लावून आत थांबणंच पसंत केलं आहे. पोलिसांनी सांगितलं आहे की जे लोक जखमी झाले आहेत त्यापैकी काही जणांची प्रकृती गंभीर आहे.
ऑस्ट्रेलियाची वेबसाईट news.com.au या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की जॉनी सैंटोस आणि केविन त्जो वूलवर्थमध्ये खेरदी करत होते. त्याचवेळी सरकत्या जिन्यावरुन एक माणूस ओरडत आला. तो म्हणाला एका माणसाने चाकू हल्ला केला आहे. त्या माणसाने हिरवा शर्ट घातला आहे असंही तो माणूस ओरडत होता. त्यानंतर गोळीबार आणि लोकांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला असंही या वेबसाईटच्या वृत्तात म्हटलं आहे.