वृत्तसंस्था, सिडनी

ऑस्ट्रेलियामध्ये १६ वर्षांखालील मुलांना समाजमाध्यमे वापरण्यावर बंदी घालणारा कायदा गुरुवारी मंजूर करण्यात आला. हा कायदा फेसबुक, इन्स्टाग्रामपासून स्नॅपचॅटसारख्या सर्व समाजमाध्यमांना लागू असून नियमभंग केल्यास कंपन्यांना ३२ दशलक्ष अमेरिकन डॉलर इतक्या दंडाची तरतूद नव्या कायद्यात करण्यात आली आहे. मुलांना समाजमाध्यम वापरावर बंदी घालणारा ऑस्ट्रेलिया हा जगातील पहिला देश ठरला आहे.

‘समाजमाध्यम किमान वयोमर्यादा विधेयक’ ऑस्ट्रेलियाच्या सेनेटमध्ये ३४ विरुद्ध १९ मतांनी गुरुवारी मंजूर करण्यात आले. कनिष्ठ सभागृहात (हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज) बुधवारी १०२ विरुद्ध १३ अशा घवघवीत मताधिक्याने या विधेयकावर मान्यतेची मोहोर उमटविली होती. नव्या कायद्यानुसार १६ वर्षांखालील मुलांना टिकटॉक, फेसबुक, स्नॅपचॅट, रेडिट, एक्स (ट्विटर) आणि इन्स्टाग्राम या समाजमाध्यमांवर खाती उघडण्यास बंदी असेल. याची अंमलबजावणी करण्यासाठी कंपन्यांना एक वर्षाचा कालावधी देण्यात आला असून त्यानंतर मात्र मोठ्या रकमेचा दंड कंपन्यांना भरावा लागेल. नव्या कायद्यावर ऑस्ट्रेलियामध्ये मतमतांतरे आहेत. बालहक्क संघटनांनी कायद्याला विरोध केला असला तरी पालकांकडून मात्र नव्या कठोर नियमांचे स्वागत केले गेले आहे. ऑस्ट्रेलियामध्ये पुढील वर्षी निवडणुका होणार असून पंतप्रधान अँथनी अल्बानिज यांच्या घटलेल्या लोकप्रियतेला या कायद्यामुळे बळकटी मिळू शकते, असे मानले जात आहे. मात्र त्याच वेळी बहुतांश अमेरिकन कंपन्यांना याचा फटका बसणार असल्यामुळे ऑस्ट्रेलिया-अमेरिका संबंधांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा >>>OTP Messages : १ डिसेंबरपासून OTP मेसेज मिळण्यास विलंब होणार? नेमकी कारणं काय? जाणून घ्या!

जगात पहिलाच कडक कायदा

●आतापर्यंत अनियंत्रित समाजमाध्यमांमुळे लहान मुलांवर होणाऱ्या दुष्परिणामांची जगभरात केवळ चर्चा होत होती.

●फ्रान्ससह अमेरिकेतील काही राज्यांमध्ये पालकांच्या परवानगीने समाजमाध्यमांत खाती उघडण्याची मुलांना परवानगी आहे.

●फ्लोरिडामध्ये १४ वर्षांखालील मुलांना संपूर्ण बंदी असलेला कायदा असला तरी त्याला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.

●ऑस्ट्रेलियाने गुरुवारी केलेला कायदा हा सर्वांत कडक असून तो अनेक देशांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो, असे मानले जात आहे.