जीममध्ये व्यायाम कऱणाऱ्या एका व्यक्तीच्या डोक्यावर २० किलो वजनाची प्लेट टाकण्यात आल्याची एक धक्कादायक घटना सध्या चर्चेत आहे. या घटनेत तो व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याच्या डोक्याला जबर इजा झाली आहे. आरोपीने आपला तोल गेल्याने प्लेट त्याच्या डोक्यावर पडल्याचा दावा केला होता. पण सीसीटीव्हीमध्ये आरोपी जाणुनबुजून तोल गेल्याचं नाटक करत असल्याचं स्पष्ट झालं आहे. कोर्टाने आरोपीला सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
ऑस्ट्रेलियामधील डार्विन येथे ऑक्टोबर २०२० मध्ये ही घटना घडली. दोघेही नेक्स्ट लेव्हल जीममध्ये व्यायाम करत होते. ही घटना कोर्टात गेली होती. सुप्रीम कोर्टाने आरोपी शेन विल्यिअम रायन याला दोषी ठरवलं असून शिक्षा सुनावली आहे.
दरम्यान या घटनेआधी दोघांनीही मैत्रीपूर्ण संवाद साधला होता याची नोंद घेतली. दुसरीकडे आरोपी रायन वारंवार अपघाताने प्लेट पडल्याचा दावा कोर्टात करत होता. पण सीसीटीव्हीमध्ये रायन २० किलो वजनाची प्लेट घेऊन बेंचवर व्यायाम करत असलेल्या सहकाऱ्याच्या दिशेने चालत जात असल्याचं स्पष्ट दिसत आहे.
पीडित व्यक्तीच्या जवळ येताच रायन वजन त्याच्या अंगावर टाकून देतो. न्यायाधीश जॉन बर्न्स यांनी निकाल देताना सांगितलं की, व्हिडीओमध्ये रायन हा पीडित व्यक्तीच्या दिशेने चालत जात त्याच्यावर वजन टाकत असल्याचं दिसत आहे. वजन डोक्यावर पडल्यानंतर रक्तस्त्राव होऊ लागल्याने पीडित व्यक्ती खाली जमिनीवर बसून होती. तर दुसरीकडे आरोपी पाय मुरगळ्याचं नाटक करत तिथे फिरत होता. यानंतर त्याने रुग्णवाहिकेला फोन करुन बोलावून घेतलं.
पीडित व्यक्तीच्या डाव्या बाजूचे हाड फ्रॅक्च झाले असून चेहऱ्यावर सूज आहे, तसंच छातीत दुखणे, डोके दुखणे असे त्रास जाणवत असून डाव्या भुवईच्या वरती जखमेचं निशाण आहे. आपण रक्तदाबासाठी औषध घेत होताो आणि घटनेनंतर भीती वाढली असल्याचं पीडित व्यक्तीने सांगितलं आहे.