ऑस्ट्रेलियाच्या अॅडलेड शहरातील एका पोस्ट ऑफिसबाहेर लावलेल्या फलकामुळे नवीन वादाला तोंड फुटलं आहे. संबंधित फलकावर “आम्ही भारतीयांचे फोटो काढू शकत नाही” अशा आशयाची सूचना लिहिली आहे. हा फलक सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ऑस्ट्रेलियातील भारतीय नागरिकांनी घटनेचा निषेध केला आहे. संबंधित फलक वर्णद्वेषी असल्याची टीका भारतीय नागरिकांकडून केली जात आहे.
अॅडलेडमधील रंडल मॉलमधील ऑस्ट्रेलिया पोस्ट ऑफिसच्या कार्यालयाबाहेर हा फलक लावण्यात आला आहे. “आमच्या प्रकाशयोजनेमुळे आणि फोटो बॅकग्राऊंडच्या गुणवत्तेमुळे, आम्ही भारतीयांचे फोटो काढू शकत नाही. गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत,” असं संबंधित फलकावर लिहिलं आहे. तसेच भारतीयांनी १२० ग्रीनफेल येथील दुसऱ्या ठिकाणी जाऊन फोटो काढावेत, असा सल्लाही फलकाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
संबंधित फलक सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ऑस्ट्रेलिया पोस्टविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेष देशाच्या लोकांना सेवा प्रदान न करण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप काहींनी केला आहे.
या प्रकारानंतर ऑस्ट्रेलिया पोस्टने दिलगीरी व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, “आक्षेपार्ह फलकामुळे झालेल्या गैरसमजाबद्दल आम्ही मनापासून दिलगीरी व्यक्त करतो. याठिकाणी काढलेल्या फोटोंमुळे अनेक भारतीयांचे पासपोर्ट अर्ज अस्वीकार झाले आहेत. हा त्रास टाळण्यासाठी संबंधित फलक लावण्यात आला होता. कारण ऑस्ट्रेलियात भारतीय पासपोर्ट स्वीकृतीबाबत वेगळे नियम आहेत. या नियमांची पूर्तता ऑस्ट्रेलिया पोस्टद्वारे केली जाऊ शकत नाही. यामुळे भारतीय लोकांचे फोटो काढण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी व्यवस्था करून दिली आहे.”