ऑस्ट्रेलियातल्या चलनी नोटांवरून महाराणी एलिझाबेथ यांचा फोटो हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियातल्या रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार नव्या पाच डॉलरवर आता आता स्वदेशी नक्षी असेल. यावर असलेला राणी एलिझाबेथ द्वितीय यांचा फोटो हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात राणी एलिझाबेथ द्वितीय यांचा मृत्यू झाला. त्यांचा फोटो ऑस्ट्रेलियातल्या चलनी नोटांवर होता. मात्र आता यापुढे छापण्यात येणाऱ्या नोटांवर हा फोटो असणार नाही.
नोटेवर महाराणींचा फोटो का छापला गेला होता?
रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की पाच डॉलरच्या नोटेवर महाराणी एलिझाबेथ यांचा फोटो यासाठी छापला गेला होता की तो फोटो त्यांचं व्यक्तिमत्त्व दर्शवणारा होता. आता आम्ही आमच्या चलनी नोटा अपडेट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आम्ही हा फोटो यापुढे नोटांवर छापणार नाही.
किंग चार्ल्स यांचा फोटो छापला जाणार नाही
ऑस्ट्रेलियाने २०२२ मध्येच ही बाब स्पष्ट केली होती की महाराणी एलिझाबेथ यांच्यानंतर किंग चार्ल्स यांचा फोटो चलनी नोटांवर छापला जाणार नाही. त्याऐवजी ऑस्ट्रेलियातली प्रतीकं नोटांवर छापली जातील. ५ डॉलरच्या नोटांचं डिझाईन हे स्वदेशी समूह करतील असंही ऑस्ट्रेलियातल्या रिझर्व्ह बँकेने सांगितलं. नव्या नोटांचं डिझाईन करण्यासाठी काही कालावधी लागणार आहे तोपर्यंत असलेल्या नोटा चलनात असतील असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
ऑस्ट्रेलियातल्या नव्या चलनी नोटांवर संस्कृती दाखवली जाणार
ऑस्ट्रेलियातल्या नव्या चलनी नोटांवर ऑस्ट्रेलियातली संस्कृती दाखवणारी प्रतीकं आणि इतिहास असणार आहे. तर एका भागावर ऑस्ट्रेलियाची संसद दाखवली जाणार आहे. याआधी २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियाने त्यांच्या राष्ट्रगीतामध्येही काही बदल केले होते. त्या बदलांमागे देशाची संस्कृती आणि सभ्यता याबाबत लोकांना माहिती व्हावी असा उद्देश होता.
क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांचं सप्टेंबर महिन्यात निधन
एलिझाबेथ द्वितीय यांचं गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात निधन झालं. त्यांनी ब्रिटनची महाराणी म्हणून ७० वर्षे राज्य केलं. एलिझाबेथ यांना जेव्हा ब्रिटनच्या महाराणी म्हणून घोषित करण्यात आलं तेव्हा त्या क्षणांची आठवण करताना एलिझाबेथ यांनी लिहिलं होतं की माझ्या वडिलांचा मृत्यू खूप लवकर झाला. मला त्यांच्यासोबत राहून शाही कामकाज कसं चालतं ते शिकण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे अचानक आलेली ही जबाबदारी योग्य पद्धतीने निभावण्याचं आव्हान माझ्यासमोर होतं. या आठवणी त्यांचा मृत्यू झाल्यानंतर लोकांनी जागवल्या होत्या.