भारतासमवेत अणुऊर्जा सहकार्य करून त्याद्वारे भारताला युरेनियमची विक्री करण्याचा मार्ग मोकळा करण्याची तयारी ऑस्ट्रेलियाने दर्शविली आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अ‍ॅबॉट यांनी बुधवारी हे संकेत दिले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या आठवडय़ात भेट होईल, त्यावेळी त्यांच्यासमवेत यासंबंधीचा करार करण्यासंबंधी चर्चा करण्यात येईल, असे ते म्हणाले.
भारताला युरेनियमची विक्री करण्याच्या कराराबरोबरच खाण उद्योग, अर्थ, शिक्षण आदी क्षेत्रांतही भारतासमवेत व्यापक सहकार्य करून उभय देशांचे संबंध बळकट करण्यावर भर दिला जाईल, असे अ‍ॅबॉट यांनी सांगितले. रशियाला जर आम्ही युरेनियम देण्यास तयार असू, तर भारतालाही ते देण्यास आम्ही तयार असल्याचे ते म्हणाले. अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर स्वाक्षरी करण्यास भारत तयार नाही, याकडे लक्ष वेधले असता, कोणत्याही करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी द्विपक्षीय कराराच्या अनुषंगाने ऑस्ट्रेलिया आपल्या हिताचे रक्षण करील, अशी ग्वाही अ‍ॅबॉट यांनी दिली.
जगातील युरेनियमच्या साठय़ापैकी एक तृतीयांश साठा ऑस्ट्रेलियाकडे असून त्यांच्यामार्फत दरवर्षी सुमारे सात हजार टन युरेनियमची निर्यात केली जाते.  या पाश्र्वभूमीवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात युरेनियमविषयक होणाऱ्या करारास महत्त्व आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा