२२ जानेवारीला राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी अयोध्येत जोरदार तयारी सुरु झाली आहे. त्याचप्रमाणे देशभरात राम मंदिर उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह आहे. अशात काँग्रेसने मात्र अपूर्ण बांधकाम झालेल्या मंदिरात प्राण प्रतिष्ठा केली जात असल्याची टीका केली आहे. यावर प्रसिद्ध लेखक अमिश त्रिपाठी यांनी उत्तर दिलं आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते आहे त्यात काही चुकीचं आहे असं वाटत नाही असं त्यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले आहेत अमिश त्रिपाठी?
“मी राजकारण काय चाललं आहे त्यावर भाष्य करणार नाही. पण माझे आजोबा वाराणसीमध्ये पंडित होते. ते कायम मूर्तींची प्राणप्रतिष्ठा किंवा इतर पूजाविधी करायचे. आपल्या भारतात एक काळ असा होता की मंदिर बांधण्यासाठी काही दशकांचा कालावधी लागत असे. कैलास मंदिरासारखं मंदिर बांधण्यासाठी तर १०० वर्षे लागली होती. अनेकदा स्थापत्य कला अवगत असणाऱ्यांना हे माहीत असायचं की मंदिर पूर्ण होईपर्यंत आपण जगणार नाही. मी जे माझ्या आजोबांकडून शिकलो, त्यानुसार मंदिरातल्या गाभारा कुठे असणार आहे त्या जागेवर पूजा केली जाते. त्यानंतर गाभारा बांधून तयार झाल्यावर एक मूर्ती तिथे ठेवून एक पूजा केली जाते. त्यानंतर तिसरा भाग असतो तो म्हणजे त्या ठिकाणी बसवण्यात येणाऱ्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा. गाभारा बांधून झाला असेल तिथे मूर्तीची पूजा झाली तर असेल प्राणप्रतिष्ठा करण्यास काहीही अडचण नसते.”
हे पण वाचा- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिकच्या काळा राम मंदिरात राबवली स्वच्छता मोहीम, ‘या’ फोटोची होते आहे चर्चा
आणखी काय म्हणाले अमिश त्रिपाठी?
तिसरा भाग असतो तो म्हणजे मंदिराचं काम संपूर्णपणे पूर्ण झाल्यावर म्हणजेच मंदिराचं बांधकाम संपल्यानंतर कलश पूजन करण्यात येतं. माझ्या समजानुसार प्राणप्रतिष्ठा करण्यास काहीही हरकत नाही असंही अमिश त्रिपाठी यांनी म्हटलं आहे. ज्या देवाची प्राणप्रतिष्ठा करायची आहे तिथे त्या देवाचं अस्तित्व मूर्तीत आलं आहे असं मानून प्राणप्रतिष्ठा केली जाते. अयोध्येतल्या राम मंदिरात ज्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे तो बाळ रुपातला राम आहे. अभिषेक आणि प्राणप्रतिष्ठा यात फरक आहे. मूर्ती पवित्र करण्यासाठी केले जाणारे विधी ही पाश्चिमात्य संकल्पना आहे. आपल्याकडे झाड, फूल, देव सगळं काही पवित्रच मानलं जातं. त्यामुळे मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली जाते असंही अमिश त्रिपाठी यांनी स्पष्ट केलं आहे.
काँग्रेसने या मंदिराचं बांधकाम अपूर्ण असल्याचं म्हटलंं आहे. मात्र अमिश त्रिपाठी यांनी मंदिराचा गाभा तयार आहे त्यामुळे या मंदिराच्या गाभाऱ्यात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात काहीही चुकीचंं नाही असं म्हटलं आहे. अमिश त्रिपाठी हे इंग्रजी भाषेत लिहिणारे लेखक आहेत. भगवान शंकराच्या आयुष्यावर त्यांनी तीन पुस्तक मालिकांचं लेखन केलं आहे. सीता द वॉरिअर ऑफ मिथिला हे त्यांचं पुस्तकही गाजलं. तसंच रामचंद्र हे या मालिकेतलं दुसरं पुस्तक आहे. त्यांनी त्यांच्या आजोबांची परंपरा आणि पूजा विधी यांचं उदाहरण देत गाभाऱ्याचं काम पूर्ण झालं असल्याने राम मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यास काहीही हरकत नसल्याचं म्हटलं आहे.