भारतीय वंशाचे ब्रिटिश-अमेरिकन लेखक सलमान रश्दी यांच्यावर पश्चिम न्यूयॉर्कमध्ये जीवघेणा हल्ला झाला आहे. रश्दी पश्चिम न्यूयॉर्कमधील एका कार्यक्रमात उपस्थित असताना व्याख्यानापूर्वी त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. चौटौका इन्स्टिट्यूटमध्ये एका व्यक्तीने स्टेजवर चढून रश्दी यांना धक्काबुक्की केली आणि त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेनंतर रश्दी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे.
हेही वाचा- तेजस्वी यादव यांचे मोदी सरकारला आव्हान; म्हणाले ‘’तपास यंत्रणांनी माझ्या घरी….’’
रश्दी यांच्या पुस्तकाला इराणमध्ये बंदी
मुंबईत जन्मलेले आणि बुकर पुरस्कार विजेते सलमान रश्दी यांचे ‘द सॅटॅनिक व्हर्सेस” नावाच्या पुस्तकास इराणमध्ये १९८८ पासून बंदी घालण्यात आली आहे. कारण अनेक मुस्लिमधर्मीय याला ईश्वरनिंदा मानतात. इराणचे दिवंगत नेते अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांनी रश्दी यांच्या मृत्यूबद्दल बक्षीस देण्याचा फतवा जारी केला होता. रश्दींची हत्या करणाऱ्या व्यक्तीला ३ दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
हेही वाचा- जम्मू काश्मीरमध्ये बिहारच्या कामगाराची गोळ्या घालून हत्या
पोलिसांकडून हल्लेखोरास अटक
सलमान रश्दी हे वादग्रस्त लेखक आहेत आणि त्यांना यापूर्वी अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रश्दी लेक्चर देण्यासाठी स्टेजवर पोहोचताच एका व्यक्तीने त्यांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. या व्यक्तीच्या हातात चाकूसारखे धारदार शस्त्रही असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. धक्काबुक्की नंतर त्याने रश्दी यांच्यावर चाकूने हल्ला केला. हल्ल्यानंतर रश्दी यांना एअर अॅम्ब्युलन्सने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली असून या हल्ल्यामागचा कारणाचा शोध घेण्यात येत आहे.