नवी दिल्ली : महाराष्ट्रात आम्ही ‘राम-राम’ म्हणणारे लोक ‘जय श्रीराम’पर्यंत कसे पोहोचलो, हेच आम्हाला कळले नाही. आम्ही आमचा महाराष्ट्र धर्म विसरलो का, उत्तरेच्या राजकारणाचे बळी पडलो का, असे बोचरे प्रश्न ‘महाराष्ट्र भाषा व महाराष्ट्र धर्म’ या परिसंवादामध्ये ज्येष्ठ साहित्यिक संजय सोनावणी यांनी उपस्थित केले.

महाराष्ट्रातील जनतेच्या आशा, आकांक्षा, स्वप्ने, निराशा या सगळ्यांचा सामूहिक उद्गार म्हणजे महाराष्ट्र धर्म. महाराष्ट्राची वैचारिक परंपरा सहिष्णुतेची, उदारतेची असली तरी आज महाराष्ट्राचे सांस्कृतिक अध:पतन झाले आहे. महाराष्ट्र धर्म संकुचित झाला आहे. महाराष्ट्राची संस्कृती झाकोळली जात आहे, महाराष्ट्रावर अनेक गोष्टी लादल्या जात आहेत, त्याचा प्रतिकार कसा करायचा हा प्रत्येक मराठी माणसापुढे प्रश्न असला पाहिजे. पण, आपण तो विचारत नाही. आपण ‘व्हॉट्सअॅप’ झालो आहोत. आला संदेश केला फॉरवर्ड एवढेच आमचे काम राहिलेले आहे. आपण मराठी लोक विचार करणारे, बुद्धी वापरणारे राहिलेलो नाही, अशी परखड टीका सोनवणी यांनी केली.

मराठी भाषा संस्कृतपासून आलेली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी विज्ञान भवनातील उद्घाटनाच्या कार्यक्रमात म्हणाले. या विधानाला तिथे कोणीही आक्षेप नोंदवला नाही.

मराठी भाषेला तुम्हीच अभिजात भाषेचा दर्जा दिला म्हणजेच ही भाषा स्वतंत्र आहे हे मान्य केले. असे असताना तुम्ही आमची भाषा संस्कृतपासून जन्माला आली असे का सांगितले, असा प्रश्न सगळ्या मराठी जनांनी मोदींना विचारला पाहिजे. मोदींच्या विधानाने आमचा महाराष्ट्र धर्म पराभूत झाला, असे स्पष्ट मत सोनवणी यांनी व्यक्त केले.

● आपण सहिष्णू आहोत असे म्हणतो, पण मराठी बांधव फणादेखील काढणे विसरलो आहोत. परभाषिक आपल्यावर आक्रमण करत असतानाही आपण फणा काढणार नसू तर आपली गलितगात्रता कधीही संपणार नाही, असे पत्रकार श्रीपाद अपराजित म्हणाले.

● कर्नाटकधर्म वा गुजरातधर्म असे म्हटले जात नाही. पण, महाराष्ट्रालाच महाराष्ट्रधर्म म्हटला जातो कारण, संतांनी सांगितलेल्या मानवतेच्या धर्माच्या सारातून महाराष्ट्रधर्माची निर्मिती झाली आहे. संत अहिंसावादी आहेत पण, क्षत्रियाचे बळ देण्याचे सामर्थ्यही त्यांच्यामध्ये आहे, असा मुद्दा डॉ. अनिरुद्ध मोरे यांनी मांडला.

● संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही मराठी भाषेची चळवळ होती, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक प्रभाकर ओव्हाळ म्हणाले. मराठी भाषेची परंपरा, विकास आणि सौंदर्यावर प्रा. अरुणा देशपांडे यांनी विचार मांडले. ● महाराष्ट्रीय माणसामध्ये राज्य करावे, नेतृत्व करावे अशी आकांक्षा शतकानुशतके होती. त्यामुळे आजही दिल्लीत एखादा मराठी नेता मोठा झाला की, हा नेता पंतप्रधान होईल का असा प्रश्न आपण विचारू लागतो. मराठी माणसामध्ये सत्ता वा राज्य करण्याची आकांक्षा आहे. मराठी माणूस अन्यायाविरोधात बंड करतो. हे सगळे कवेत घेणारी आहे ती मराठी भाषा. हे महाराष्ट्रधर्माचे तीन पैलू आहेत, असेही पत्रकार श्रीराम पवार म्हणाले.

Story img Loader