पीटीआय, नवी दिल्ली : भारतात २०२१ मध्ये एकूण ३१ हजार ६७७ बलात्काराच्या, म्हणजेच दररोज सरासरी ८६ गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच दर तासाला सुमारे ४९ महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांची नोंद झाली. २०२० मध्ये २८ हजार ४६ बलात्काराचे गुन्हे नोंदवले गेले तर, २०१९ मध्ये ३२ हजार ३३ गुन्हे नोंदवले गेले. गृह मंत्रालयांतर्गत काम करणाऱ्या राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (एनसीआरबी) ‘क्राइम इन इंडिया २०२१’ अहवालात ही माहिती देण्यात आली.
या अहवालानुसार २०२१ मध्ये राजस्थानमध्ये सर्वाधिक सहा हजार ३३७ बलात्काराच्या घटनांची नोंद झाली, त्याखालोखाल मध्य प्रदेशात दोन हजार ९४७, महाराष्ट्रात दोन हजार ४९६, उत्तर प्रदेशात दोन हजार ८४५, दिल्लीत एक हजार २५० बलात्काराच्या घटना घडल्या. २०२१ मध्ये देशभरात एकूण चार लाख २८ हजार २७८ महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे नोंदवले गेले आहेत, प्रति एक लाख लोकसंख्येमागे ही सरासरी ६४.५ टक्के आहे. अशा गुन्ह्यांत ७७.१ टक्के प्रकरणांत आरोपपत्र दाखल करण्यात आले.
या आकडेवारीनुसार, २०२० मध्ये देशभरात तीन लाख ७१ हजार ५०३ महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे आणि २०१९ मध्ये चार लाख पाच हजार ३२६ गुन्हे नोंदवले गेले. उत्तर प्रदेशमध्ये २०२१ मध्ये सर्वाधिक ५६ हजार ८३ महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे नोंदवले गेले. याखालोखाल राजस्थानमध्ये ४० हजार ७३८, महाराष्ट्रात ३९ हजार ५२६, पश्चिम बंगालमध्ये ३५ हजार ८८४ आणि ओडिशामध्ये ३१ हजार ३५२ गुन्ह्यांची नोंद झाली.