Avimukteshwaranand Saraswati शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सत्ता हवी होती तेव्हा मंदिर-मंदिर असा जप सुरु केला होता. सत्तेत आल्यानंतर मंदिर शोधू नका असा सल्ला मोहन भागवत देत आहेत. अशी बोचरी टीका अविमुक्तेश्वरानंद यांनी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोहन भागवत काय म्हणाले होते?

मशि‍दींखाली मंदिराचा दावा करून कसं चालणार? कोणत्याही प्रार्थनास्थळांखाली हिंदू मंदिरे असण्याचा दावा करणे स्वीकारहार्य नसल्याचं मोहन भागवत यांनी म्हटलं होतं, त्यांच्या याचा विधानाचा दाखल देत शंकराचार्यांनी मोहन भागवतांवर टीकास्त्र सोडलं. राजकीय सोयीनुसार त्यांनी विधानं केली असा आरोपही शंकराचार्य यांनी केला.

शंकराचार्यांची मोहन भागवत यांच्यावर टीका

शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी मोहन भागवत यांच्या विधानाशी सहमत नसल्याचं म्हटलं आहे. मोहन भागवत राजकीयदृष्ट्या सोयीची भूमिका घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले, जेव्हा त्यांना सत्ता हवी होती तेव्हा ते मंदिरांबद्दल बोलत राहिले. आता सत्ता आल्यावर मंदिरं शोधू नका असा सल्ला ते देत आहेत, असं शंकराचार्यांनी म्हटलं आहे.

अविमुक्तेश्वरानंद सरस्वती आणखी काय म्हणाले?

अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले की, भूतकाळात परकीय आक्रमकांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांची यादी तयार करावी आणि वास्तूंचं सर्वेक्षण केलं जावं. यापूर्वी हिंदूंवर अनेक अत्याचार झाले आहेत. त्यांची धार्मिक स्थळं उद्ध्वस्त झाली आहेत. आता हिंदू समाजाला आपल्या मंदिरांचा जीर्णोद्धार आणि जतन करायचं असेल तर त्यात गैर काय? असा प्रश्न अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी विचारला.

अविमुक्तेश्वरानंद सरस्वती कोण आहेत?

उत्तराखंडच्या जोशीमठ या ठिकाणी असलेल्या ज्योतिर्मठाचे शंकराचार्य हे स्वामी अविमुक्तेश्वरानंद आहेत. स्वरुपानंद सरस्वती यांचं २०२२ मध्ये निधन झालं. त्यानंतर अविमुक्तेश्वरानंद यांच्याकडे शंकराचार्य पद आलं. स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींचा जन्म उत्तर प्रदेशातल्या प्रतापघढ जिल्ह्यातील पट्टी तालुक्यात असलेल्या ब्राह्मणपूर या गावात झाला. त्यांच मूळ नाव हे उमाशंकर उपाध्याय आहे. त्यांनी वाराणसीतल्या संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठातून शास्त्री आणि आचार्य होण्याच्या परीक्षा दिल्या आहेत. तसंच ते राजकारणातही सक्रिय होते. १९९४ मध्ये त्यांनी विद्यार्थी परिषदेची निवडणूकही लढवले होती. शिक्षणानंतर अविमुक्तेश्वरानंद शिक्षणानंतर गुजरातलाही गेले होते. अविमुक्तश्वरानंद सरस्वती यांनी राम मंदिराला विरोध दर्शवला होता. मंदिर पूर्ण बांधून झालेलं नाही त्यामुळे मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करु नये असं शंकराचार्य यांनी म्हटलंं होतंं. आता मोहन भागवत यांच्यावर टीका केल्याने शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती पुन्हा चर्चेत आले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Avimukteshwaranand saraswati criticized rss chief mohan bhagwat over his statement scj