राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी, मंगळवारी मंदिर सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले करण्याआधी तेथील मुख्य प्रवेशद्वाराजवळ भाविकांची प्रचंड गर्दी झाल्याने तिचे व्यवस्थापन करताना यंत्रणांची पुरती दमछाक झाली. राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा आणि त्यानंतर रामदर्शनासाठी अयोध्येत भाविक दाखल झाले आहेत. मंदिराकडे जाणारा रामपथ भाविकांच्या गर्दीने पहाटेपासूनच ओसंडून वाहत होता. मुख्य प्रवेशाद्वाराजवळ रेटारेटीसदृश्य स्थिती होती. तर, आता दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्र्यांना अयोध्येत न जाणाच्या सूचना केल्या आहेत. फ्री प्रेसने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाची आज (२४ जानेवारी) बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील राम मंदिरात न जाण्याचा सल्ला दिला आहे. अयोध्येत राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्या झाल्यापासून गर्दीने उच्चांक गाठला आहे. त्यातच व्हिआयपी नेते तिथे गेल्यास व्हीआयपी प्रोटोकॉलमुळे गर्दीत भर पडेल, परिणामी भाविकांना अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे केंद्रीय मंत्र्यांनी मार्चमध्ये अयोध्या दौरा निश्चित करावा, अशा सूचना मोदींनी दिल्या आहेत.
हेही वाचा >> अयोध्येतील राम मंदिरात रामाच्या दर्शनाला आलं माकड, भाविक म्हणाले, “हनुमानजी…”
पहिल्याच दिवशी घेतला ५ लाख भाविकांना दर्शनाचा लाभ
२२ जानेवारी रोजी राम मंदिरात भगवान रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या ऐतिहासिक सोहळ्याकरता देशभरातून भाविक अयोध्येत दाखल झाले होते. तसंच, दुसऱ्यादिवशी म्हणजेच मंगळवारी २३ जानेवारी रोजी सकाळी सहा वाजल्यापासून भाविकांना राम मंदिर संकुल परिसरात प्रवेश देण्यास प्रारंभ झाला. दिवसअखेरपर्यंत सुमारे पाच लाख भाविकांनी मंदिर संकुलाला भेट दिल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. राम मंदिर संकुल परिसरात आठ हजारांहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
हे भाविक प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या आधीच अयोध्येत दाखल झाले आहेत. मोठमोठ्या बॅगा, सुटकेस आणि अन्य साहित्यामुळे रामपथावर लोकांची ‘कोंडी’ झाल्याचे चित्र होते.
भाविकांची प्रचंड गर्दी पाहता बाराबंकी पोलिसांनी रामभक्तांना पुढे न जाण्याचे आवाहन केले आहे. अयोध्या ते बाराबंकी हे अंतर सुमारे १०० किलोमीटर आहे. पोलिसांनी लोकांना यापुढे न जाण्याचे आवाहन केले आहे. अयोध्या धाममध्ये भाविकांची संख्या मोठी असल्याने सर्व वाहनांच्या मार्गांमध्ये बदल करण्यात आला आहे. दरम्यान, अयोध्येत भाविकांच्या अनेक किलोमीटर लांब गर्दीमुळे राम लल्लाचे दर्शन थांबवले नसल्याचे स्पष्टीकरण अयोध्या पोलिसांनी दिले आहे.