भारतातील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या व तो थांबण्यासाठी कायद्यात बदल करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणाऱ्या दिल्लीतील कांत बंधूंना अमेरिकेतील मानाच्या पुरस्काराने मंगळवारी गौरविण्यात आले. रवी, रिषी आणि निशी हे कांत बंधू ‘सॉलिडेरिटी अॅवॉर्ड’चे यंदाचे मानकरी ठरले.
 उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्यांचा गौरव करण्यासाठी हिलरी क्लिंटन यांनी १९९७ पासून हा पुरस्कार सुरू केला आहे. येथील प्रतिष्ठित केनेडी सेंटरमध्ये झालेल्या या कार्यक्रमात अमेरिकेचे उपाध्यक्ष जो बिडेन यांच्या हस्ते कांत बंधूंना हा पुरस्कार देण्यात आला. महिलांवरील अत्याचार, बालमजुरी, भिकाऱ्यांच्या समस्या, खोटय़ा प्रतिष्ठेसाठी होणाऱ्या मुलींच्या हत्या या विरोधात कांत बंधूंनी ‘शक्ती वाहिनी’ ही सेवाभावी संस्था दशकभरापूर्वी स्थापन केली असून या माध्यमातून जनजागृती करणे, तसेच समाजातील या अनिष्ट बाबी सरकारच्या लक्षात आणून देणे आदी कार्य त्यांनी केले आहे.
महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी संबंधित कायद्यात बदल करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्याचे कामही या संस्थेने केले आहे. अन्याय व अत्याचाराविरुद्ध लढणाऱ्या आदिमाया शक्तीचे नाव आम्ही आमच्या संस्थेला दिले असून या कार्यात आम्हाला अनेकांचे सहकार्य लाभत आहे, अशी प्रतिक्रिया रवी कांत यांनी व्यक्त केली.  

Story img Loader