* मेक्सिकोमध्ये विस्तारण्यासाठी वॉलमार्टने अवलंबिलेली भ्रष्टाचारी धोरणविषयक बातमी सर्वोत्तम
* असोसिएटेड प्रेसला उत्कृष्ट छायाचित्रासाठी पुरस्कार
वृत्तपत्र क्षेत्रातील प्रतिष्ठेचे मानले जाणारे पुलित्झर पुरस्कार जाहीर करण्यात आले असून, द न्यू यॉर्क टाइम्स या वृत्तपत्राला चार पुरस्कार मिळाले आहेत. मेक्सिकोमध्ये आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी वॉलमार्ट या रिटेल क्षेत्रातील कंपनीने कसा आणि किती भ्रष्टाचार केला, हे बाहेर काढणाऱ्या वृत्ताला सर्वोत्तम वृत्तांकनाचा पुरस्कार मिळाला आहे.
सर्वोत्तम छायाचित्रांच्या विभागात असोसिएटेड प्रेसला पुरस्कार मिळाला. सिरिया येथील नागरी युद्धाच्या छायाचित्रांसाठी हा पुरस्कार देण्यात आला. असोसिएटेड प्रेसच्या रॉड्रिगो अब्द, मनु ब्राबो, नार्सिसो कॉन्ट्रेरास, खलिल हमरा आणि मुहम्मद मुहेसैन या पाच छायाचित्रकारांना हा पुरस्कार देण्यात आला. ‘जगातील सर्वात धाडसी आणि सर्वोत्तम छायाचित्रकार’ अशा शब्दांत त्यांचा गौरव करण्यात आला.
न्यूयॉर्कमधील ना नफा तत्त्वावर चालणाऱ्या आणि ऊर्जा क्षेत्राशी संबंधित बातम्या ऑनलाइन पद्धतीने प्रसिद्ध करणाऱ्या वृत्तसंस्थेस अमेरिकेतील तेलाच्या पाइपलाइनविषयक नियमन धोरणातील दोष दाखवणाऱ्या वार्ताकनासाठी पुलित्झर पुरस्कार देण्यात आला.
पत्रकारितेच्या क्षेत्रातील सर्वोच्च मानले जाणारे पुलित्झर पुरस्कार दरवर्षी कोलंबिया विद्यापीठातर्फे दिले जातात. मान्यवर पत्रकारांच्या मंडळातर्फे १० हजार डॉलर रोख इनाम असलेल्या पुरस्कारासाठी विजेत्यांची निवड केली जाते.
यंदा सर्वाधिक पुरस्कार पटकावीत बाजी मारणाऱ्या न्यूयॉर्क टाइम्सला चीनमधील कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांची तसेच त्यांच्या नातेवाईकांची मालमत्ता जाहीर करणाऱ्या बातमीबद्दल आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील वृत्तांकनाचा पुरस्कार जाहीर झाला. तसेच अॅपल या संगणकाच्या क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीचे व्यावसायिक धोरण उलगडून दाखविल्याबद्दल स्पष्टीकरणात्मक वार्ताकनाच्या विभागातील पुरस्कारही न्यूयॉर्क टाइम्सलाच मिळाला. ‘द स्टार ट्रिब्यून’ला स्थानिक वृत्तांकनाच्या विभागात, तर स्टीव्ह सॅक यांना संपादकीय व्यंगचित्र विभागात हा पुरस्कार देण्यात आला. अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावर टीकात्मक लेखन करणाऱ्या वॉल स्ट्रीट जर्नलच्या ब्रेट स्टीफन्स यांना टीकात्मक लेखनासाठी पुलित्झर देण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा