लेखक, इतिहासकार, विचारवंतांना राष्ट्रपतींचे आवाहन
देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या निषेधार्थ लेखक, इतिहासकार, चित्रपट निर्माते, विद्वान यांच्याकडून पुरस्कार परत करण्यात येत असल्याबद्दर राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी नाराजी व्यक्त केली. पुरस्कार विजेत्यांनी त्यांचा मान राखला पाहिजे आणि भावना तारतम्यापेक्षा वरचढ होऊ देऊ नये, असे आवाहन मुखर्जी यांनी केले.
कोणतेही मतभेद चर्चेद्वारे व्यक्त करावे आणि तसे करताना भावना कारणांवर वरचढ होणार नाहीत याची काळजी घ्यावी. देशात असहिष्णुतेच्या प्रश्नावर उलटसुलट चर्चा सुरू असून, त्या पाश्र्वभूमीवर मुखर्जी यांनी हे मत व्यक्त केले.
समाजात घडणाऱ्या काही घटनांमुळे संवेदनक्षम मने अस्वस्थ होतात, तेव्हा अशा स्थितीत संतुलित मत करावे, असेही मुखर्जी म्हणाले. प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रपती बोलत होते.
आपल्या घटनेतील मूल्ये आणि तत्त्वे यांचा एक भारतीय म्हणून आपल्याला अभिमान असला पाहिजे, असेही ते म्हणाले. ‘दि इम्पॅक्ट अ‍ॅण्ड इम्पोर्ट ऑफ कार्टुनिंग अ‍ॅण्ड कॅरिकेचर्स अ‍ॅज ए मीडियम ऑफ एक्स्प्रेशन ऑफ ओपीनियन’ या विषयावर ते बोलत होते.
आपल्या भाषणात राष्ट्रपतींनी कोणत्याही विशिष्ट घटनेचा संदर्भ दिला नाही. मात्र असहिष्णुतेचे प्रतिबिंब म्हणून पाहण्यात येणाऱ्या काही घटनांच्या पाश्र्वभूमीवर त्यांच्या मतांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कार्यक्रमात मुखर्जी यांनी दिवंगत व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण आणि राजिंदर पुरी यांना आदरांजली वाहिली.

सामाजिक जीवनात भावनांना बुद्धीपेक्षा वरचढ होऊ देणे कधीही घातक असते. ते कोणत्याही व्यक्तीकडून घडू नये. अशा गोष्टींसाठी संयम असणे आवश्यक आहे . निषेध हा चर्चेतूनच व्यक्त झाला पाहिजे, असे राष्ट्रपती म्हणाले.

Story img Loader