Ayatollah Khamenei on Iran Israel Tension : इराणची राजधानी तेहरानमध्ये ४ ऑक्टोबर रोजी दुपारी नमाज पठणानंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खोमेनी यांनी भाषण केलं. त्यांनी इस्रायल व पॅलेस्टाइनमध्ये चालू असलेल्या संघर्षावर टीप्पणी केली. इराणच्या या सर्वोच्च नेत्याने पाच वर्षांनंतर नमाज पठणानंतर भाषण केलं. पॅलेस्टाइनचा संघर्ष योग्य असल्याचं खोमेनी यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले, “पॅलेस्टाइनला त्यांची स्वतःची जमीन परत मिळवण्याचा पूर्ण अधिकार आहे”. यावेळी खोमेनी यांनी सर्व मुस्लीम राष्ट्रांना एकजूट होण्याचं आवाहन केलं. इराणपासून लेबनॉनपर्यंतच्या संपूर्ण मुस्लीम समुदायाला आवाहन केलं की त्यांनी पॅलेस्टाइनसाठी उभं राहावं.
अयातुल्लाह खोमेनी म्हणाले, “अफगाणिस्तानपासून येमेनपर्यंत आणि इराणपासून गाझा, लेबनॉनपर्यंत सर्व मुस्लीम देशांना कंबर कसावी लागणार आहे. इराण हेझबोलाबरोबर उभा आहे. इस्रायलला इराणने सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. इस्रायलने आमच्यावर हल्ला केला तर इराणदेखील स्वस्थ बसणार नाही. पॅलेस्टाइन, लेबनॉन व इराणमधील इस्रायलच्या कारवायांमुळे आम्ही दुःखी आहोत, मात्र आम्ही पराभूत झालेलो नाही”.
हे ही वाचा >> Kim Jong-un : इस्रायल-इराण, रशिया-युक्रेन युद्धादरम्यान किम जोंग-उनची आण्विक हल्ल्याची धमकी, ‘या’ देशाची चिंता वाढली
खोमेनींचा इस्रायलला इशारा
खोमेनी म्हणाले, “अरब मुस्लिमांनी देखील यामध्ये उतरावं. सर्व मुस्लिमांनी बंधूभाव बाळगावा. यातच आपल्या समुदायाचं भलं आहे. इस्रायलच्या हल्ल्यांचा, आक्रमणांचा आम्ही विरोध करत आहोत, यापुढेही करत राहू. आमच्या सशस्त्र बलांनी इस्रायलविरोधात केलेली कारवाई कौतुकास्पद आहे. ती कारवाई उचित व कायदेशीर आहे. गरज पडल्यास आम्ही इस्रायलवर पुन्हा एकदा हल्ला करू. इस्रायल आमच्यासमोर फार वेळ टिकणार नाही”.
खोमेनींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
१) शत्रूचे मनसुबे अयशस्वी होतील
२) इराणपासून लेबनॉनपर्यंतच्या मुस्लीम समुदायाने एकत्र यावं.
३) शत्रूपासून सावध रहावं लागेल
४) अल्लाहने दाखवलेल्या मार्गावरून बाजूला होऊ नका
५) सगळे मुस्लीम एकत्र राहिले तर सर्वांचं भलं होईल, अन्यथा शत्रूचं काम सोपं होईल.
६) मुस्लीम बंधूभाव महत्त्वाचा
७) पॅलेस्टाइन त्यांच्या हक्काची लढाई लढत आहे.
८) पॅलेस्टाइनची लढाई वैध आहे. गेल्या वर्षी ७ ऑक्टोबर रोजी पॅलेस्टाइनने जे काही केलं तो युद्धाचाच भाग होता
९) इराणी सैन्याने जे काही केलं ते योग्यच होतं.
१०) आम्ही आमची कारवाई चालूच ठेवू, आम्ही मागे हटणार नाही.