अयोध्येतील श्री राम मंदिर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. मंदिर परिसरात तैनात असलेला एका प्लाटून कमांडर गोळी लागून जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. ५३ वर्षीय कमांडर राम प्रसाद यांना गोळी लागून ते जखमी झाले आहेत. राम प्रसाद यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, गरजेची उपचार प्रणाली तिथे उपलब्ध नसल्याने त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टिमसह लखनौच्या ट्रॉमा सेंटर येथे हालवण्यात आलं. ट्रॉम सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार चालू आहेत. दरम्यान, गोळीबाराच्या आवाजाने परिसरात खळबळ उडाली होती.

बंदुकीच्या गोळीचा आवाज ऐकून आसपास तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी गोळीच्या आवाजाच्या दिशेने धाव घेतली. तेव्हा त्यांनी पाहिलं की, राम प्रसाद यांच्या छातीत गोळी लागली होती आणि ते जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. तसेच राम प्रसाद यांना दर्शन नगर येथील एका विभागीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथल्या डॉक्टरांनी राम प्रसाद यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना ट्रॉमा सेंटर येथे नेण्यास सांगितलं.

राम प्रसाद हे मूळचे अमेठीचे रहिवासी आहेत. त्यांचं कुटुंब लखनौ येथे वास्तव्यास आहे. एके-४७ रायफलमधून निघालेली गोळी राम प्रसाद यांच्या छातीतून आरपार गेली आहे. त्यामुळे राम प्रसाद यांच्या शरिरात खोलवर जखमा झाल्या आहेत. त्यांची परिस्थिती सध्या गंभीर आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी या घटनेचा तपास करत आहेत.

हे ही वाचा >> ‘भारताचा अभिमान!’; जगातील सर्वात उंच ‘चिनाब रेल्वे पूला’चा व्हिडीओ मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला शेअर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येतील श्रीरामाच्या मंदिराचं उद्घाटन केलं होतं. त्यानंतर हे मंदिर देशभरातील भाविकांसाठी खुलं करण्यात आलं आहे. उद्घाटनापासून दररोज दिड ते दोन लाख भाविक दररोज अयोध्येत जाऊन रामलल्लांचं दर्शन घेत आहेत.

Story img Loader